भारताद्वारे लसींची निर्यात बंद झाल्यानं ९१ देशांवर नव्या कोरोना स्ट्रेनचा धोका वाढला : WHO
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 11:07 PM2021-05-31T23:07:09+5:302021-05-31T23:11:23+5:30
Covid 19 Pandemic : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात हाहाकार माजला होता. त्यानंतर भारतानं अन्य देशांना लस पाठवण्यावर घातली होती बंदी.
"भारतीय लसींची निर्यात बंद केल्यामुळे जगभरातील ९१ देशांवर कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे," असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी केलं. हे गरीब देश कोविशिल्ड (Covishield) या लसीवर अवलंबून होते. याची भारतात निर्मिती अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. तसंच कोरोना प्रतिबंधात्मक नोवावॅरक्सच्याही हे देश प्रतीक्षेत असल्यातं त्यांनी सांगितलं.
"भारतात सर्वप्रथम कोरोनाचा B.1.617.2 व्हेरिअंट सापडला होता. करोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा होत नसल्यानं आफ्रिकी देशांवर या व्हेरिअंटचा धोका वाढला आहे. अन्य गरीब देशांनाही लसीचा पुरवठा न होण्याची शक्यता आहे. या देशांमध्ये B.1.617.2 व्हेरिअंट तेजीनं पसरत आहे. याची ओळख पटण्यापूर्वीच हा विषाणू तेजीनं पसरतो. विषाणूच्या ११७ व्हेरिअंटमध्ये असं दिसून आलं आहे," असं स्वामिनाथन म्हणाल्या. एनडीटीव्हीशी सांधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
... तर अजून फटका बसेल
"जर लसींचा असाच असमान पुरवठा सुरू राहिला तर काही देशांमध्ये याचा मोठा फटका बसू शकेल. येणाऱ्या लाटा गरीब देशांसमोर मोठं संकट निर्माण करू शकतात. परंतु भारताला कोणीही सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून मोठ्या प्रमाणात लस खरेदीसाठी कोणीही थाबवू शकत नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा पर्याय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारनं आता १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.