कोरोनाने चौदा दिवसांत दहा लाख बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 11:58 PM2020-04-17T23:58:32+5:302020-04-17T23:58:42+5:30
बाधितांची संख्या २० लाखांवर : दोन आठवड्यांत दररोज पाऊण लाखाची वाढ
विशाल शिर्के
पुणे : जगभरातील कोरोना (कोविड-१९) बाधितांचा आकडा गुरुवारी वीस लाखांच्या पार गेला. जानेवारी २०२०च्या शवेटच्या आठवड्यात जगभरातील ४ देशांमधे अवघे २८२ रुग्ण होते. त्यानंतर अवघ्या ८८ दिवसांमधे बाधितांचा आकडा वीस लाखांवर गेला असून, त्यात वेगाने वाढ होत आहे. त्यातील १४ दिवसांत तब्बल १० लाखांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. म्हणजेच गेल्या दोन आठवड्यांत दररोज पाऊण लाखानी रुग्णसंख्या वाढली आहे. मृतांची संख्याही दुप्पट झाली आहे. जगभर बधितांचा आकडा वेगाने वाढत असला तरी भारतात बधितांच्या संख्येत ४० टक्के घट झाल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. देशात १५ ते ३१ मार्च दरम्यान २ टक्के दराने वाढ होत होती. ते प्रमाण १.२ टक्क्यापर्यंत खाली आले आहे.
चीनने जागतिक आरोग्य संघटनला २० जानेवारी रोजी वेगळ्या विषाणूचा आजार असल्याची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या २१ जानेवारीच्या अहवालात चीनमधे २५८, जपान, रिपब्लिक कोरिया प्रत्येकी १ आणि थायलंडमधे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर जगभरात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडे गुरुवारी (दि. १६) १९ लाख ९१ हजार ५६२ रुग्ण असल्यांची नोंद होती. त्यात शुक्रवारी (दि. १७) दुपारपर्यंत तब्बल २० लाख ३४ हजार ८०२ रुग्णांपर्यंत वाढ झाली. रुग्णवाढीचा वेग पाहता शनिवारी बाधितांचा आकडा २१ लाखांच्या घरात गेला असेल. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत भारतासह २५ देशांमधे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्या वेळी असलेल्या ५० हजार ५८० पैकी ५० हजार ५४ रुग्ण एकट्या चीनमधील होते. अवघे ५२६ रुग्ण इतर देशांमधे आढळून आले. आता सर्वाधिक बाधितांची संख्या असलेल्या अमेरिकेमध्ये अवघे १५ रुग्ण होते. पुढे, १ मार्चपर्यंत ५८ देशांत कोरोनाचा प्रसार झाला. तर, रुग्ण संख्या ८७ हजारावर गेली. मार्च अखेरीस (दि. ३१) दोनशेहून अधिक देशांमधे कोरोनाचा प्रसार झाला होता. तर, रुग्णसंख्या साडेसात लाखांवर गेली. तर, ३ एप्रिल उजाडेपर्यंत २१३ देशांमधे कोरोनाचा प्रसार वाढला. रुग्णांची संख्या पावणेदहा लाखांवर गेली. जगभरात ४ एप्रिल रोजी १० लाख ५१ हजार रुग्णांचा आकडा पार झाल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात झाली आहे. म्हणजेत २८२ ते १० लाख रुग्णांचा टप्पा पार करायला ७४ दिवस लागले. तर, त्यांनतरच्या दहा लाख रुग्णांचा आकडा अवघ्या १४ दिवसांतच वाढला आहे. मार्च महिन्यात दररोज सुमारे ३० हजार रुग्णांची भर पडली. तर ३ एप्रिल नंतरच्या १४ दिवसांमधे दररोज ७५ हजार ८९२ रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडे १७ एप्रिलरोजी दुपारपर्यंत बाधितांची संख्या २० लाख ३४ हजार ८०२ वर पोहोचली होती. वाढीचा वेग लक्षात घेता शनिवारपर्यंत (दि. १८) हा आकडा २१ लाखांच्या घरात जाईल अशी शक्यता आहे. मृतांची संख्या १ लाख ३५ हजारांवर पोहोचली आहे. मृतांचा आकडादेखील दीड लाखाच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
आरोग्य संघटनेच्या ३ एप्रिलच्या अहवालानुसार पावणेदहा लाख रुग्ण बाधित होते, तर मृतांची संख्या ५० हजार ३२१ होती. म्हणजेच १४ दिवसांत मृतांच्या संख्येत ८४ हजार ८४२ची भर पडली आहे. दररोज सुमारे सहा हजारांनी मृतांची संख्या वाढली आहे.
अशी वाढली बाधितांची संख्या
देश १ फेब्रुवारी १५फेब्रु १ मार्च १५ मार्च ३१ मार्च ५ एप्रिल १७ एप्रिल
चीन ११,८२१ ५०,०५४ ७९,९६८ ८१,०४८ ८२,५४५ ८२,९३० ८३,४०३
अमेरिका ७ १५ ६२ १६७८ १,४०,६४० २,७३,८०८ ६,६७,८०१
इटली २ ३ ११२८ २१,१५७ १,०१,७३९ १,२४,६३२ १,६८,९४१
फ्रान्स ६ ११ १०० ४,४६९ ४३,९७७ ६७,७५७ १,४७,०९१
जर्मनी ७ १६ ५७ ३७९५ ६१,९१३ ९१,७१४ १,३७,६९८
स्पेन १ २ ४५ ५७५३ ८५,१९५ १,२४,७३६ १,८४,९४८
ब्रिटन २ ९ २३ ११४४ २२,१४५ ४१,९०७ १,०४,१४५
इराण ० ० ५९३ १२,७२९ ४१,४९५ ५५,७४३ ७७,९९५
भारत १ ३ ३ १०७ १,०७१ ३३७४ १४,२२९
(स्त्रोत : जागतिक आरोग्य संघटना आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठ )