Corona Virus: चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे बळींची संख्या ४९० वर; ३,२१९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 02:50 AM2020-02-06T02:50:21+5:302020-02-06T06:19:58+5:30
२४,३२४ जणांना लागण
बीजिंग : चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या ४९० वर पोहोचली आहे. त्या देशात या विषाणूची लागण आतापर्यंत २४,३२४ जणांना झाली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत आणखी ६५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे या विषाणूचा संसर्ग झालेले ३,८८७ नवे रुग्ण आढळून आले. हुबेई प्रांतातील ४३१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ३,२१९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर संपूर्ण देशात उपचारानंतर ८९२ लोक बरे झाले आहेत. या रुग्णांच्या सतत संपर्कात असलेल्या सुमारे अडीच लाख लोकांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.हाँगकाँगमध्ये १८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मकाऊमध्ये १० तर तैवानमध्ये ११ रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी चीनमध्ये हजार खाटांचे रुग्णालय सोमवारी सुरू करण्यात आले होते, तर १,३०० खाटांचे रुग्णालय बुधवारपासून सुरू झाले.
वुहान शहरामध्ये आणखी आठ फिरती रुग्णालये सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. कोरोनाग्रस्तांपैकी ९९ टक्के रुग्ण चीनमध्ये असून, अन्य देशांत फक्त १७६ रुग्ण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.जपानमध्ये आलेल्या एका क्रुझमधील १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे त्या देशात अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या २० झाली आहे. या क्रूझमध्ये ३,७११ प्रवासी असून, त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यातील एका हाँगकाँगच्या नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
वुहानवरून दोन आठवड्यांपूर्वी परतलेला व कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे घरीच उपचार घेत असलेल्या एका युवकाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर आपला विवाह पुढे ढकलावा लागला.हा विवाह ३ फेब्रुवारी रोजी होणार होता; पण त्याच्या एक दिवस आधीच विवाहाची माहिती ग्रामपंचायतीच्या सदस्यांना मिळताच त्यांनी हा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. त्यानंतर वैद्यकीय अधिकाºयांनी हस्तक्षेप करून त्या युवकाला नियोजित विवाह पुढे ढकलायला लावला.
केरळमध्ये कोची शहरात कोची वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. नोटीस बोर्डसमोरून महिला बुधवारी तिच्या बाळाला घेऊन जात होती.