...पण ऐकतील ते ट्रम्प कसले?; 20 वर्षं चाललेल्या व्हिएतनाम युद्धापेक्षा जास्त अमेरिकींचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:51 PM2020-04-29T18:51:42+5:302020-04-29T19:27:43+5:30
1955 ते 1975पर्यंत, असे तब्बल 20 वर्ष अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यात युद्ध सुरू होते. मात्र तेव्हाही गेला नव्हता एवढ्या अमेरिकन नागरिकांचा बळी कोरोनाने अवघ्या 2-3 महिन्यात घेतला आहे...
वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना व्हायरसने आतापर्यंत 59 हजार 250हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर 10 लाख 35 हजारहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा हा आकडा 20 वर्ष चालेल्या व्हिएतनाम युद्धात मारल्या गेलेल्या अमेरिकन सैनिकांपेक्षाही अधिक आहे. 1955 ते 1975पर्यंत चाललेल्या या व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने आपले जवळपास 58 हजार सैनिक गमावले होते.
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरससंदर्भात 12 वेळा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येकवेळा त्याकडे दुर्लक्ष केले. आता कोरोनाने अमेरिकेला मगरमिठी मारली आहे.
चीननेही, डोनाल्ड ट्रम्प आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारत असल्याचा आरोप केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की अमेरिकेचे नेते खोटे बोलत आहेत. आपल्या जबाबदारीपासून वाचण्यासाठी दुसऱ्याला दोष देणे, एवढाच त्यांचा हेतू आहे.
ट्रम्प यांना आधीच दिली होती कोरोना व्हायरस घातक असल्याची सूचना -
सीआयएच्या अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की राष्ट्राध्यक्षांना सूचना दिली होती, की चीनमध्ये पसरणारा कोरोना व्हायरस हा अत्यंत घातक आहे. चीन ही गोष्ट लपवत आहे. असे यापूर्वी कधीही बघितले गेलेले नाही. मात्र, ट्रम्प यांनी आमच्या सूचनेकडे पार दुर्लक्ष केले.
ट्रम्प म्हणतात...
अमेरिकेतील परिस्थितीवर बोलताना ट्रम्प म्हणतात, जगातील देशांच्या तुलनेत आम्ही अधिक टेस्ट केल्या. यामुळे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्णम समोर आले. आमचा आमच्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांवर पूर्ण विश्वास आहे. तसेच अनेक गोष्टींवर आम्ही मोठे निर्णय घेतले आहेत. जसे, तज्ज्ञांचा विरोध असतानाही, आम्ही देशाच्या सीमा बंद केल्या.
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत निवडणुका -
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत 15 राज्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकी पूर्वी होणारी प्राथमीक निवडणूक टाळली आहे. यापैकी अनेकांनी ही निवडणूक जूनपर्यंत टाळली आहे. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मोठे नुकसान होऊ शकते, असेही बोलले जात आहे. ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामांवर अनेक जण नाराज आहेत. अधिकांश तज्ज्ञांचे आणि डॉक्टरांचेही हेच मत आहे.