भयावह! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; तिसऱ्या लाटेचे संकेत, स्मशानभूमीबाहेर रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 09:04 AM2022-12-19T09:04:39+5:302022-12-19T09:04:51+5:30
बीजिंगमधील सर्वात मोठ्या स्मशानभूमी बाबोशनची अवस्था भयावह आहे. येथे पार्किंगसाठीही जागा शिल्लक नाही
बीजिंग - चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोविडच्या दहशतीमुळे लोक स्वत:ला आयसोलेट करत आहेत. त्यामुळे रस्त्यावर भयाण शांतता दिसून येतेय. चीनच्या अनेक बड्या शहरात कोरोना रुग्णांनी डोके वर काढले आहे. त्यात काही शहरांत हॉस्पिटलमध्ये एंटिझेन टेस्ट किटची कमतरता जाणवू लागली आहे. स्मशानभूमीत रांगा लागल्यात. आगामी काही दिवसांत चीनमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल त्यासाठी अलर्ट राहा. कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे असा इशारा चीनमधील तज्ज्ञांनी दिला आहे.
चीनचे महामारी प्रमुख व्यू जुन्यो यांनी इशारा दिलाय की, देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. क्रिसमस, न्यू ईयर, लूनर न्यू ईयर या सणांमध्ये धोक्याची घंटा आहे. कारण या सणाला सगळेजण एकत्रित येतात. त्यामुळे अशा वातावरणात धोका कित्येक पटीने वाढू शकतो. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील पहिला टप्पा या सर्दीमध्ये येईल असं त्यांनी म्हटलं.
खरं तर, चीनच्या शी जिनपिंग सरकारने देशातील अनेक निषेधांनंतर कोविडसंदर्भातील शून्य कोविड धोरण संपुष्टात आणले होते. यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये अनपेक्षित वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेल्या शहरांमध्ये कोरोनाचा आलेख वाढत आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे दहशत निर्माण झाली आहे. केटरिंगपासून ते पार्सल आणि डिलिव्हरीपर्यंतच्या सेवा येथे विस्कळीत झाल्या आहेत. एवढेच नाही तर परिस्थिती अशी आहे की २२ मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कारण कोविड पॉझिटिव्ह आढळल्यामुळे येथे काम करणारे मोठ्या संख्येने लोक रजेवर गेले आहेत.
बीजिंगमधील सर्वात मोठ्या स्मशानभूमी बाबोशनची अवस्था भयावह आहे. येथे पार्किंगसाठीही जागा शिल्लक नाही. स्मशानभूमीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, अंत्यसंस्कारासाठी बुकिंग करणे अवघड आहे. त्यामुळे लोक आपल्या परिचयांचे मृतदेह खासगी वाहनांनीच आणत आहेत. येथील स्मशानभूमीतून दिवसभर धूर निघत असल्याची परिस्थिती आहे. चीनच्या वायव्येला असलेल्या शियान शहरातील भुयारी मार्ग रिकामे दिसत आहेत, तर देशाच्या व्यावसायिक केंद्र शांघायमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षानंतर कोणतेही विशेष उपक्रम नाहीत. येथे सणासुदीचे वातावरण नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. लोक घाबरले आहेत. चीनमधील चेंगडूमध्ये रस्ते समुसाम असताना, रुग्णालयांमध्ये अँटीजेन चाचणी किटचाही तुटवडा असल्याची परिस्थिती आहे.