Corona in North Korea :नॉर्थ कोरियात कोरोनाचा उद्रेक, चार दिवसात 8 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद तर 42 मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 12:30 PM2022-05-15T12:30:46+5:302022-05-15T12:30:59+5:30
Corona in North Korea : 12 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
North Korea corona: आतापर्यंत ज्या देशात एकही कोरोना रुग्ण सापडल्याच्या बातम्या येत नव्हत्या, त्या देशात आता कोरोनाचा विस्फोट झाला आहे. उत्तर कोरियामध्ये कोरोनाने रौद्र रुप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत तेथे 8 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे, गुरुवारी(दि.12) उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. उत्तर कोरिया गेल्या दोन वर्षांपासून सांगत होता की, त्यांच्याकडे कोरोनाचे एकही प्रकरण नाही, परंतु आता परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे. अलीकडेच उत्तर कोरियाकडून माहिती देण्यात आली होती की एप्रिलमध्ये राजधानी प्योंगयांगमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. यानंतर, 15 आणि 25 एप्रिल रोजी राजधानीत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तिथे अनेकांनी मास्क लावला नव्हता, त्यामुळेच कोरोनाचा फैलाव झाल्याचा अंदाज आहे.
कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता हुकूमशहा किम जोंग उन यांनी याला मोठी आपत्ती घोषित केले आहे. तर आता उत्तर कोरियातील कोरोनाचे हे दृश्य जगासाठी तणावाचे कारण बनले आहे. कारण उत्तर कोरियातील आरोग्य सुविधा अत्यंत खराब आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित होऊ शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की उत्तर कोरियाला लस, औषधे आणि इतर वैद्यकीय पुरवठा त्वरित न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. येथे, यूएसने आंतरराष्ट्रीय मदत प्रयत्नांना समर्थन दिले आहे, परंतु उत्तरेला लस पुरवठा सामायिक करण्याची योजना नाही.