कोरोनाचा कहर रोखला जाऊ शकतो! पण, करावं लागेल एवढं एकच काम; वैज्ञानिकांचा दावा
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 25, 2020 04:26 PM2020-11-25T16:26:28+5:302020-11-25T16:27:24+5:30
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा कहर पुन्हा वाढताना दिसत आहे. यूरोपातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिघडताना दिसत आहे.
सिंगापूर - जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वैज्ञानिक मंडळी विविध प्रकारचा अभ्यास आणि संशोधन करत आहेत. अशाच एका संशोधनात किमान 70 टक्के लोकांनी सातत्याने मास्कचा वापर केला, तर कोरोना व्हायरस महामारीचा कहर रोखला जाऊ शकतो, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. या संशोधनाच्या समीक्षेतून, मास्कचा वापर कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतो, असे समोर आले आहे.
फिजिक्स ऑफ फ्ल्यूइड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात, फेस मास्कवर करण्यात आलेल्या अभ्यासांचे मूल्यमापन करण्यात आले आहे आणि यावर, फेस मास्क वापरल्याने व्हायरस पसरवणाऱ्या लोकांची संख्या कमी होते? यासंदर्भात महामारी वैज्ञानिकांनी समीक्षा केली आहे.
सिंगापूर येथील नॅशनल यूनिव्हर्सिटीचे संजय कुमार, यांच्यासह वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की सर्जिकल मास्कसारखे अत्यंत प्रभावी फेस मास्कचा 70 टक्के लोकांनी बाहेर नेहमीवापर केला, तर कोरोना व्हायरस महामारीला रोखले जाऊ शकते. एवढेच नाही, तर कापडी मस्कदेखील कोरोना व्हायरसच्या प्रसाराची गती कमी करू शकतात, असेही वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की जेव्हा एखादी व्यक्ती बोलते, शिंकते, खोकलते अथवा श्वास घेते, तेव्हा नाकातून आणि तोंडातून निघालेल्या द्रवाच्या थेंबांपासून फेस मास्क संरक्षण करते. त्यांनी सांगितले, की मोठे थेंब हे 5 ते 10 मायक्रॉनचे असतात. ते सर्वसामान्य आहेत. मात्र, 5 मायक्रॉनपेक्षा कमी असलेले थेंब अधिक धोकादायक असू शकतात.
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा कहर पुन्हा वाढताना दिसत आहे. यूरोपातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिघडताना दिसत आहे. यातच कोरोना लशीसंदर्भातही चांगल्या बातम्या येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. कोरोना लस जोवर येत नाही, तोवर लोकांनी काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. यासाठी लोकांना सातत्याने फेस मास्कचा वापर करण्यासंदर्भात, डिस्टंसिंगचे पालन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आला आहे. जोवर कोरोना लस येत नाही, तोवर मास्क हेच लस आहे. असे अनेक वेळा सांगण्यात आले आहे.