CoronaVirus: युराेपमध्ये वाढू लागले कोरोनाचे रुग्ण; कुठे लॉकडाऊन, तर काही देशांत कठोर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 04:45 AM2021-04-21T04:45:54+5:302021-04-21T04:46:01+5:30
CoronaVirus: युरोपात लसींच्या पुरवठ्यावरूनही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फ्रान्समध्ये चार आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
पॅरिस : युरोपातील देशांमध्ये फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, इटलीत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. ब्रिटनमधील नवा स्ट्रेन आणि आफ्रिकेतील कोरोनाने तज्ज्ञांची काळजी वाढविली आहे.
युरोपात लसींच्या पुरवठ्यावरूनही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फ्रान्समध्ये चार आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या निर्बंधाचा परिणाम देशात दिसत आहे. शाळा आदी शैक्षणिक संस्था बंद आहेत. १ एप्रिल रोजी देशात ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. ती संख्या आता ३६ हजारपर्यंत कमी झाली आहे.
जर्मनीतही १० मार्चपासून कोरोनाची लाट आलेली आहे. देशात २९ हजारपेक्षा अधिक रुग्ण दररोज आढळून येत आहेत. तरुणांमध्येही संसर्ग होत आहे.
इटलीत मागील वर्षी कोरोनाने अक्षरश: हाहाकार उडविला होता. त्यामुळे देशात रेड झोन, ऑरेंज झोन ठरविण्यात आले आहेत. रेड झोनमध्ये शाळा, महाविद्यालय बंद आहेत. बाजारपेठाही बंद आहेत. १ एप्रिल रोजी इटलीत दररोज २३ हजार रुग्ण आढळून येत होते. आज ही संख्या १५ हजारांपर्यंत कमी झाली आहे. मृत्यूचा आकडाही आठवड्यात कमी झाला आहे. कोरोनाच्या मागच्या लाटेत मोठा फटका बसलेल्या स्पेनमध्ये संचारबंदी लागू आहे. सध्या या देशात दररोज दहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत.
अमेरिकेत लसीकरणावर भर
अमेरिकेत मागील वर्षी कोरोनाने कहर केला होता. आता पुन्हा एकदा ही लाट आली आहे. देशात दररोज ८० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. अध्यक्ष बायडेन यांनी लसीकरणावर भर दिला आहे. अमेरिकेत सध्या ६८ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. कॅनडातही दररोज ५ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.
ब्राझीलमध्ये सध्या ११ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. रशियात २ लाख ६९ हजार सक्रिय रुग्ण आहेत. पाकिस्तानात ८३ हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. बांगलादेशात ८९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ब्रिटनमध्ये आता निर्बंधातून सूट मिळत आहे. बाहेर सहापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. लग्न समारंभासाठी १५ लोकांची परवानगी आहे. १ एप्रिल रोजी देशात ४५०० रुग्ण आढळून येत होते. आता हीच संख्या २७०० पर्यंत खाली आली आहे. ब्रिटनमध्ये सक्रिय रुग्ण कमी होऊन एक लाखापेक्षा कमी झाले आहेत.