४० टक्के चिनी लोकसंख्येला कोरोना; जपानही विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 08:46 AM2023-01-07T08:46:59+5:302023-01-07T08:47:28+5:30
प्रत्येक शहरातील सुमारे ५० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे.
बीजिंग : चीनने देशातील कोरोना परिस्थिती कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी ती कोठून ना कोठून पुढे येत आहे. गेल्या महिन्यात चीनच्या ४० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त एशिया टाइम्सने दिले आहे, तर येथील प्रत्येक शहरातील सुमारे ५० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे.
चिनी आरोग्य विभागाच्या एका लीक झालेल्या अहवालानुसार, दि. १ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षावर देखरेख ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून, चीनमध्ये स्मशानभूमीचा विस्तार केला जात असल्याचे दिसते. स्मशानभूमीत मृतदेहांचा ढीग आहे. जागेअभावी त्या ठिकाणी लांबच लांब रांगा लागत असून, अनेक दिवस प्रतीक्षाही सुरू आहे. हा व्हिडीओ हुनान प्रांतातील यियांग शहराचा आहे.
जपानही विळख्यात
जपानमध्येही कोरोना नियंत्रणाबाहेर जात आहे. गुरुवारी येथे २ लाख २६ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदविली गेली आहेत. राजधानी टोकियोमध्येच २० हजार ७३५ प्रकरणे नोंदविली गेली, तर देशभरात ३३४ मृत्यू झाले आहेत.
चीनचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न
चीनने कोविड साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यानंतर या महिन्यात चिनी नववर्षाच्या काळात प्रवासादरम्यान कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. परिवहन मंत्रालयाने शुक्रवारी प्रवाशांना, विशेषत: वृद्ध लोक, गर्भवती महिला, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी प्रवास कमी करण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले.
भारतात स्थिती सामान्य
देशातील कोरोनाची स्थिती सर्वसामान्य असली, तरी विविध राज्यांत कोरोना उपप्रकारांचे रुग्ण आढळत आहेत. मध्य प्रदेशात इंदूरमध्ये ओमायक्रॉनच्या एक्सबीबी.१ या उपप्रकाराने ग्रस्त महिला आढळली आहे. पश्चिम बंगालमध्ये ओमायक्रॉनचा उपप्रकार बीएफ.७ चे चार नवीन रुग्ण आढळून आले आहेत.