कोरोना : ट्रम्प यांचा ढिसाळ कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 02:43 AM2020-10-01T02:43:39+5:302020-10-01T02:43:54+5:30
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचा आरोप
वॉशिंग्टन : अमेरिकेतील कोरोनाची स्थिती ट्रम्प यांनी ढिसाळपणे हाताळली, असा आरोप राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कोरोना साथीला रोखण्यासाठी आम्ही जी कामगिरी करून दाखविली ती बिडेन यांना कधीही जमली नसती. ती धडाडी रक्तात असावी लागते. प्रसंग होता मंगळवारी रात्री या दोन उमेदवारांमध्ये झालेल्या जाहीर चर्चेचा.
तुम्ही जरा गप्प बसणार का? (विल यू शट अप, मॅन?) या शब्दांत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले. या चर्चेच्या पहिल्या फेरीत रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. पहिल्या फेरीतील चर्चा कोरोनाची साथ, शहरात सुरू असलेला हिंसाचार, वाढती बेकारी, तसेच देशाच्या आरोग्य योजनेचे सर्वोच्च न्यायालय ठरविणार असलेले भवितव्य या मुद्यांभोवती केंद्रित झाली होती.
ज्यो बिडेन बोलत असताना, त्यांना थांबविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प अक्षरश: अंगावर ओरडत होते, तर जो बिडेन हेदेखील काहीशा आक्रमकपणे ट्रम्प यांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न करीत होते.
क्लीव्हलँड येथे दोन उमेदवारांमध्ये जाहीर चर्चेची पहिली फेरी झाली. यावेळी ज्यो बिडेन म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प करीत असलेला प्रत्येक दावा खोटा आहे. ते सर्वांनाच माहीत आहे. अमेरिकेतील मतदारांमध्ये तरंगत्या मतदारांचा वर्ग असतो की, जो कोणाला मत द्यावे हे आयत्या वेळेस ठरवितो. अशा मतदारांवर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला विजय मिळणार, हे कधी-कधी अवलंबून असते. त्यामुळे या मतदारांना आकृष्ट करण्याचा बिडेन व ट्रम्प यांनी प्रयत्न चालविला होता. (वृत्तसंस्था)