गूडन्यूज! अमेरिकेत लवकरात लवकर कोरोना लस आणण्याची तयारी, फायझरने FDAकडे मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 04:38 PM2020-11-21T16:38:30+5:302020-11-21T16:43:19+5:30
कोरोनापासून मुक्तीसाठी संपूर्ण जगाच्या नजरा वैज्ञानिकांकडे लागल्या आहेत. अखेरच्या विष्लेशनात ही लस 95% प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
वॉशिंग्टन - कोरोना व्हायरस महामारीनंतर जगातील अनेक देश कोरोनावरील लस तयार करण्याच्या कामात लागले आहेत. अनेक लशी अखेरच्या टप्प्यावर आहेत. यातच आता, अमेरिकेतील दिग्गज बायोटेक कंपनी फायझर (Pfizer) आणि तिची जर्मन सहकारी कंपनी BioNTechने शुक्रवारी अमेरिकन प्रशासनाकडे, ही कोरोनालस लवकरात लवकर उपलब्ध करता यावी, यासाठी परवानगी मागितली आहे. अनेक देशांत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आणि पुन्हा बंद सारखी परिस्थिती निर्माण होण्याचे चिन्ह असतानाच हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.
कोरोनापासून मुक्तीसाठी संपूर्ण जगाच्या नजरा वैज्ञानिकांकडे लागल्या आहेत. यासंदर्भात बोलताना, अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) म्हटले आहे, की त्यांची व्हॅक्सीन कमिटी आणीबाणीजन्य परिस्थितीतील वापराच्या मंजूरीसाठी मागण्यात आलेल्या परवानगीवर विचार करण्यासाठी 10 डिसेंबरला भेट घेईल. संघटनेचे प्रमुख स्टेफेन हन म्हणाले," लोकांमध्ये कोरोना लशीप्रति विश्वास निर्माण करण्यासाठी चर्चा आणि पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे, असे एफडीएला वाटते."
स्टेफेन हन म्हणाले, "मी अमेरिकन नागरिकांना विश्वास देतो, की एफडीएची प्रक्रिया आणि संभाव्य कोरोना लशीसाठीचे मूल्यांकन जेवढे शक्य असेल, तेवढे खुले आणि पारदर्शक केले जाईल. पण, समीक्षेसाठी किती वेळ लागेल याचा अंदाजा लावला जाऊ शकत नाही. मात्र, डिसेंबरमध्ये लशीला हिरवा झेंडा दाखवला जाईल, असे अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे.
तत्पूर्वी, अखेरच्या विष्लेशनात ही लस 95% प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तसेच ते एका दिवसाच्या आतच आवश्यक त्या परवानगी साठी अर्ज करतील, असे फायझरने म्हटले होते.