Corona vaccination: फुकट फ्लॅट, कार देतो; पण प्लीज, लस घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 06:25 AM2021-08-02T06:25:32+5:302021-08-02T06:26:37+5:30
Corona vaccination News: जगातील सर्वात मोठ्या ऑफर्स हाँगकाँगनं देऊ केल्या आहेत. लसीकरण केलेल्या नागरिकांना त्यांनी टेस्ला कार, सोन्याचं बिस्किट, अत्यंत महागडं रोलेक्स घड्याळ, लक्षावधी डॉलर्सचा आलिशान फ्लॅट... अशा अनेक गोष्टी देऊ केल्या आहेत.
जेसन चॅन हा हाँगकाँगचा एक रहिवासी. तिथे अनेकांनी अजूनही कोरोनाची लस घेतलेली नाही. जेसन त्यातलाच एक. लस घेण्यासाठी अनेक सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याला गळ घातली, पण तो आपला ढिम्म. त्याला लस घ्यायचीच नव्हती! पण अचानक एके दिवशी तत्परतेने तो लसीकरण केंद्रावर गेला आणि लसीसाठी नोंदणी केली. त्यानंतर लस घेतलीही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त जेसनच नाही, त्याच्यासारखे जे हजारो लोक लसीकरणाला नाही म्हणत होतेे, तेही अचानक रांगेत उभे राहिले आणि लस टोचून घेऊ लागले. एवढंच नाही, सोबत आपल्या घरच्यांनाही आग्रहाने सोबत घेऊन जाऊ लागले! असं काय कारण होतं, ज्यामुळे लोक लसीकरणासाठी इतक्या वेगानं तयार झाले?.. जेसन म्हणतो, एके दिवशी मी एका बिल्डरची जाहिरात पाहिली. त्यात म्हटलं होतं, ज्यांनी लसीकरण केलेलं असेल, त्यांना फुकटात आलिशान फ्लॅट मिळण्याची सुवर्णसंधी! माझ्या डोक्यात आलं, कोण जाणे, तो भाग्यवान मीही असू शकतो ! लस घेतली म्हणून फार तर काही साईड इफेक्ट्स होतील, पण आपण मरणार तर नाही... मग लस घेऊन नशीब अजमावायला काय हरकत आहे?”
- अनेकांनी असाच विचार केला आणि त्यांनी लसीकरण केंद्रांकडे धाव घ्यायला सुरुवात केली. अर्थात लसीकरणासाठी अशी लालूच दाखविणारा हाँगकाँग हा काही एकमेव देश नाही. अनेक विकसित देशांनीही लोकांना लसीकरणाकडे आकृष्ट करण्यासाठी नागरिकांना मोठमोठी आमिषं दाखवायला सुरुवात केली आहे. या ‘लॉटरी’मध्ये नंबर लागला, तर लोक मालामाल होऊ शकतील, अशा जगातील सर्वात मोठ्या ऑफर्स हाँगकाँगनं देऊ केल्या आहेत. लसीकरण केलेल्या नागरिकांना त्यांनी टेस्ला कार, सोन्याचं बिस्किट, अत्यंत महागडं रोलेक्स घड्याळ, लक्षावधी डॉलर्सचा आलिशान फ्लॅट... अशा अनेक गोष्टी देऊ केल्या आहेत. अर्थातच ‘लॉटरी’मध्ये ज्यांचा नंबर लागेल, त्यांनाच या वस्तू मिळतील!
अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटनसारख्या देशांमध्येही विजेत्यांना ‘वर्ल्ड टूर’, आयफोनसारख्या ऑफर्स दिल्या जात आहेत. इतर काही देशांत विमानाचं तिकीट, बिअर इत्यादी गोष्टी भाग्यवंतांना मोफत दिल्या जात आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग चांगलाच वाढला आहे. हाँगकाँगमध्ये आतापर्यंत जवळपास तीस टक्के लोकांचं (२२.७ लाख) लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यातील तब्बल १० टक्के लोकांनी गेल्या १०-१५ दिवसात म्हणजे ‘ऑफर’ मिळाल्यानंतर लसी घेतल्या आहेत. एका टप्प्यानंतर लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविण्याचंही कारण आहे. जगात सारेच देश लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करीत असले तरी, अनेक नागरिकांना कोरोना लसीविषयीच शंका आहे. लसींच्या उपयुक्ततेविषयी अनेक ठिकाणी, माध्यमांत बऱ्या-वाईट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अनेकांनी लसींचे साईड इफेक्ट्सही नमूद केले आहेत. त्यात लसीकरणामुळे नपुंसकत्व येते, अशीही अफवा आणि समज आहे. चिनी लसींच्या उपयुक्ततेविषयी तर जगातल्या जवळपास शंभर देशांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग म्हणावा तसा वाढत नाहीये. त्यासाठी अनेक देशांमध्ये नागरिकांचं मन वळविण्यासाठी त्यांना ‘लालूच’ही दिली जात आहे.
लोकांनी काळजी घेतल्यामुळे हाँगकाँगमध्ये मुळातच कोरोनाचा प्रसार फार कमी झालेला आहे. जगात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून त्यांच्याकडे आतापर्यंत केवळ बारा हजार रुग्ण सापडले, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. हाँगकाँगमध्ये ज्या दिवशी १४ लाख डॉलर्स किमतीच्या फ्लॅटची ऑफर जाहीर झाली, त्याच दिवशी तब्बल साडेचार लाख लोकांनी लसीकरण केलं. ही ऑफर सप्टेंबरपर्यंत सुरू राहाणार असली तरी, लोक आपलं भाग्य अजमावण्यासाठी आतापासूनच पुढे येत आहेत. ज्यावेळी ड्रॉ काढला जाईल, त्यावेळी विजेत्यांना पुरावा म्हणून आपलं लसीकरण प्रमाणपत्र सादर करावं लागेल. ते असेल तरच त्यांना बक्षिसासाठी दावा करता येईल आणि तरच ते त्यासाठी पात्र ठरतील. ‘लॉटरी’ लागली, पण प्रमाणपत्र नसेल, तर दुसरा विजेता काढला जाईल.
लसीकरण वाढविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना खासगी क्षेत्रही साथ देत आहे. त्यामुळे त्यांनीही नागरिकांना वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जगात अनेक देशांत लसींचा तुटवडा आहे, पण हाँगकाँगमध्ये लसींचे लक्षावधी डोस अक्षरश: पडून आहेत. फायजर-बायोएनटेकचे हे डोस ऑगस्टमध्ये एक्स्पायर होतील. त्यांची मुदत संपेल. त्यानंतर त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. उलट त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खर्च करावा लागेल.
भारतातही मिळतील सुविधा!
लसीकरण करणाऱ्या लोकांना भारतातही काही सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियानं लसीकरण केलेल्या लोकांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींवर अधिक व्याज देऊ केले आहे. गोदरेज कंपनीनं आपल्या उत्पादनांवर जास्त कालावधीची वॉरंटी देऊ केली आहे. इंडिगो कंपनी लसीकरण केलेल्या प्रवाशांना तिकिटांवर दहा टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. लसीकरण माहिमेसाठी इतरही अनेक कंपन्या पुढे येत आहेत.