Corona Vaccination: बापरे! एक, दोन नव्हे, तब्बल ८७ वेळा घेतली कोरोना लस; समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:56 AM2022-04-04T11:56:22+5:302022-04-04T11:56:43+5:30
Corona Vaccination: ६१ वर्षांचा नागरिक दिवसातून तीन वेळा घ्यायचा कोरोना लस
बर्लिन: भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असताना चीन, दक्षिण कोरियात मात्र कोरोनानं हातपाय पसरले आहेत. लसीकरण होऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानं काही देश बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. जर्मनीमध्ये मात्र एक भलताच प्रकार घडला आहे. एका नागरिकानं एक, दोन नव्हे, तर तब्बल ८७ वेळा कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. फ्री प्रेसे नावाच्या वृत्तपत्रानं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तब्बल ८७ वेळा कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. लसीच्या विरोधात असलेल्या लोकांनी एका ६१ वर्षीय व्यक्तीला लस घेण्यासाठी पैसे दिले होते. लस घेण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तींनी ६१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला पैसे दिले. त्यानंतर या नागरिकानं सेक्सोनीसह आणखी तीन राज्यांमध्ये जाऊन लस घेतली.
६१ वर्षांची व्यक्ती दररोज तीन वेगवेगळ्या लसीकरण केंद्रात जायची. नाव आणि वय सांगून लस घ्यायची. त्यानं कोणत्याच केंद्रावर आरोग्य विमा कार्ड दाखवलं नाही. या कार्डवर संबंधित व्यक्तीच्या लसीकरणाच्या तपशीलाची नोंद असते. मात्र ज्येष्ठ नागरिकानं कोणत्याच केंद्रावर आरोग्य विमा कार्ड दाखवलं नाही.
ड्रेसडेनच्या लसीकरण केंद्रावर कार्यरत असलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्यानं ज्येष्ठाला ओळखलं. त्यानं याची माहिती थेट पोलिसांना दिली. पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ज्येष्ठाला अटक केली. आरोपीविरोधात सेक्सोनी आणि इतर काही राज्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद झाली असून तपास सुरू झाला आहे.