३ अब्ज डोस पुरविल्यावर कोरोनाची लस घेतली माघारी; दुर्मीळ दुष्परिणामांच्या कबुलीनंतर ॲस्ट्राझेनेकाने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 06:48 AM2024-05-09T06:48:35+5:302024-05-09T06:48:50+5:30
ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनावरील लशीची निर्मिती केली. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने ‘कोव्हिशिल्ड’, तर युरोपात ‘व्हॅक्सवेरिया’ लशीचे उत्पादन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या व प्लेटलेट्सची संख्या कमी होत असल्याचे उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेनेकाने न्यायालयात कबुल केले. त्यानंतर कंपनीने जगभरातून ही लस परत मागविण्यास सुरुवात केली. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या लशींची संख्या अधिक असल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनावरील लशीची निर्मिती केली. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने ‘कोव्हिशिल्ड’, तर युरोपात ‘व्हॅक्सवेरिया’ लशीचे उत्पादन करण्यात आले. लशीमुळे दुर्मीळ स्वरूपात दुष्परिणाम होत असल्याचे समोर आल्यानंतर कंपनीनेही ते मान्य केले. त्यानंतर कंपनीने स्वतःहून ही लस मागे घेण्याची घोषणा केली. तसेच युरोपीयन मेडिसिन एजन्सीने मंगळवारी याबाबत नोटीस जारी केली.
६५ लाखांहून अधिक जीव वाचविले
कोविड-१९ लसीचे अत्यंत दुर्मीळ दुष्परिणाम असू शकते. ‘व्हॅक्सवेरिया’ने जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यात जी भूमिका बजावली त्याचा आम्हाला कमालीचा अभिमान आहे, असे कंपनीने म्हटले.
लस सादर झाल्यानंतर पहिल्या वर्षात ६५ लाखांहून अधिक लोकांचे जीव वाचले आणि जगभरात तीन अब्जाहून अधिक डोस पुरवले गेले.
भारतात २२० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आणि त्यापैकी बहुतांश कोव्हिशिल्ड होत्या.