माकडाच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचला कोरोना व्हायरस; मात्र लस देताच झाला चमत्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:42 AM2020-03-18T06:42:50+5:302020-03-18T06:43:24+5:30
कोरोनाची लस शोधण्यात चीनला यश आल्याचे वृत्त आहे. चीनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या ही माहितीनुसार या लसीची चाचणी माकडांवर करण्यात आली.
बीजिंग : कोरोनाची लस शोधण्यात चीनला यश आल्याचे वृत्त आहे. चीनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या ही माहितीनुसार या लसीची चाचणी माकडांवर करण्यात आली. माकडांमध्ये आधी कोरोनाचे विषाणू माकडांमध्ये सोडण्यात आले. तीन दिवसांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आली. या लसीमुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्तीत वाढल्याचे आढळून आले आहे.
माकडांमध्ये कोरोनाचे विषाणू सोडल्यानंतर सातव्या दिवशी एका माकडाच्या शरीरात ते पसरू लागले. त्याच्या फुफ्फुसापासून विविध भागांत हे विषाणू पसरले. मात्र, लस देण्यात आल्यानंतर प्रकृतीत सुधारणा दिसली असल्याचे प्रा. किन चुआन यांनी सांगितले. एक महिन्यानंतर काही माकडांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होऊन ते विषाणुमुक्त झाले. त्यांची चाचणीही निगेटिव्ह आली आणि शरीरातील सर्व अवयव नीट काम करीत असल्याचे आढळले.
प्रकृतीत सुधारणा झालेल्यापैकी दोन माकडांच्या शरीरात एका महिन्याने तोंडाद्वारे पुन्हा विषाणू सोडण्यात आले. त्यांना ताप आला, मात्र कोरोनाची अन्य कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. दोन आठवड्यांनी त्यांची आॅटोप्सी झाली. त्यातही विषाणूही आढळला नाही. त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा हा परिणाम होता, असे या दैनिकाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
आत्मविश्वास वाढला : कोरोनावरील लस अद्याप मानवांना देण्यात आली नसली तरी माकडांवर झालेला प्रयोग यशस्वी झाल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. संशोधनातील हे यश खूप महत्त्वाचे आहे, असे प्रा. चुआन यांनी म्हणाले. ही लस कोरोनाचा संसर्ग झालेल्या माणसांनासाठी उपयोगी पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिका, फ्रान्समध्येही संशोधन : अमेरिका, चीन व फ्रान्समधील शास्त्रज्ञ कोरोनावर उपचार शोधत असून, अमेरिकेत सोमवारी एका युवकाला लस टोचण्यात आली. तिथे एकूण ४५ युवकांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे.