Corona Vaccine : बापरे! लस घेतली नाही तर भरावा लागणार 5 हजार रुपये टॅक्स; 'या' देशाने उचललं अनोखं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 12:54 PM2022-01-13T12:54:13+5:302022-01-13T13:04:34+5:30
Corona Vaccine : अनेक देशातील कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. पण अद्याप अनेक ठिकाणी लोकांमध्ये लसीबाबत संभ्रम असलेला पाहायला मिळत आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 31 कोटींचा टप्पा पार केला असून 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वच देशांत वेगाने लसीकरण सुरू असून अनेक देशातील कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. पण अद्याप अनेक ठिकाणी लोकांमध्ये लसीबाबत संभ्रम असलेला पाहायला मिळत आहे. खूप लोकांनी लस घेतलेली नाही. याच दरम्यान आता एका देशाने अनोखं पाऊल उचललं आहे. कोरोना लस न घेणाऱ्याकडून आता टॅक्स वसूल केला जाणार आहे.
जे नागरिक कोरोना लसीकरण करून घेणार नाहीत, त्यांच्याकडून अतिरिक्त आरोग्य कर आकारण्याचा निर्णय कॅनडातील (Canana) क्यूबेक (Quebec) या प्रांताने घेतला आहे. लसीकरणाला नकार देणारे नागरिक हा आरोग्य व्यवस्थेवर येणारा एक मोठा ताण असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असे नागरिक स्वतः लस घेत नसल्यामुळे ते असुरक्षित असतात आणि कोरोना विषाणूचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरतात असा दावा करण्यात आला आहे. लस न घेतलेल्यांकडून 80 कॅनेडियन डॉलर म्हणजे भारतीय चलनातील सुमारे 5 हजार रुपये इतका टॅक्स आकारला जाणार आहे.
लसीकरण न केलेल्या व्यक्तींसाठी नवीन आरोग्य कर लागू करण्याची तयारी
WION च्या एका रिपोर्टनुसार, कॅनडाचा क्यूबेक प्रांत COVID-19 साठी लसीकरण न केलेल्या व्यक्तींसाठी नवीन आरोग्य कर लागू करण्याची तयारी करत आहे. क्यूबेक प्रीमियरचे फ्रेंकोइस लेगॉल्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही लसीकरणास नकार देणार्या सर्वांसाठी आरोग्य करावर काम करत आहोत कारण ते सर्व येथील लोकांसाठी आर्थिक भार ठरत आहेत". त्यामुळेच लसीकरण न झालेल्या प्रत्येक व्यक्तीला यापुढे अतिरिक्त आरोग्य कर भरणं बंधनकारक करण्यात येणार आहे.
10 टक्के लोकांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही
क्यूबेकमध्ये 10 टक्के लोक आहेत ज्यांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही. अशा लोकांना लसीकरण झालेल्या 90 टक्के लोकांना नुकसान करण्याचा अधिकार नाही असं म्हटलं आहे. या निर्णयातून अपवादात्मक कारणांसाठी लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींना वगळण्यात येणार आहे. अनेक व्यक्तींना लसीकरण न करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. अशा प्रकारे वैद्यकीय कारणांसाठी लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींवर हा कर लादण्यात येणार नाही असंही स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.