Corona vaccine : कोरोनाविरोधातील Sputnik-V लसीमुळे AIDS होण्याचा धोका? Namibiaने वापरावर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 02:10 PM2021-10-24T14:10:05+5:302021-10-24T14:10:44+5:30
Corona vaccine: आफ्रिकन देश Namibiaने रशियाची कोरोनाविरोधातील लस Sputnik-V या लसीच्या वापरावर बंदी घातली आहे. नामिबियाचा शेजारील देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये लसीबाबत व्यक्त करण्यात येत असलेल्या चिंतेनंतर नामिबियाने हे पाऊल उचलले आहे.
विंडहोक - आफ्रिकन देश नामिबियाने रशियाची कोरोनाविरोधातील लस स्पुतनिक-व्ही या लसीच्या वापरावर बंदी घातली आहे. नामिबियाचा शेजारील देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये लसीबाबत व्यक्त करण्यात येत असलेल्या चिंतेनंतर नामिबियाने हे पाऊल उचलले आहे. स्पुतनिक-व्ही लसीचा डोस घेणाऱ्या पुरुषांना एचआयव्ही होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते, असा दावा करण्यात येत आहे.
नामिबियाचे आरोग्यमंत्रालयाने याबाबत सांगितले की, दक्षिण आफ्रिकेच्या निर्णयानंतर नामिबियाच्या सरकारनेही तत्काळ प्रभावाने या लसीच्या वापरावर बंदी घातली आहे. जोपर्यंत डब्ल्यूएचओकडून या लसीच्या आपातकालिन उपयोगासाठी परवानगी मिळत नाही तोपर्यंत ला लसीच्या वापराला परवानगी मिळणार नाही.
स्पुतनिक-व्ही लस विकसित करणाऱ्या जमेलिया रिसर्च इन्स्टिट्युटने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इन्स्टिट्युटने सांगितले की, नामिबियाचा निर्णय कुठल्याही शास्त्रीय पुराव्यांवर आधारित नाही आहे. दक्षिण आफ्रिकेतील नियामक SAHPRA ने देशात स्पुतनिक-व्ही लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. काही संशोधनामधून स्पुतनिक-व्हीमध्ये एडेनोव्हायरस टाइप ५ व्हेक्टर असल्याचे दिसून आले आहे, याच्या वापरामुळे पुरुषांमध्ये एचआयव्ही होण्याची शक्यता वाढते, असे नियामकने सांगितले.
भारतामध्येही स्पुतनिक-व्ही लसीच्या आपातकालीन वापराला परवानही मिळाली होती. मात्र आतापर्यंत अशाप्रकारची कुठलीही शक्यता दिसून आलेली नाही.