Corona Vaccine : अरे व्वा! "मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि हॉटेलमध्ये मोफत जेवण मिळवा"; 'य़ा' देशात भन्नाट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 11:42 AM2021-10-03T11:42:57+5:302021-10-03T11:54:18+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत.
जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांचा आकडा हा 23 कोटींच्या वर गेला आहे. तर लाखो लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण रुग्णांची संख्या 235,434,078 वर पोहोचली आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे.
कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. याच दरम्यान आणखी एका देशात कोरोना लसीकरण नागरिकांना केंद्रावर जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. आपल्या मित्राला कोरोनाची लस घेण्यासाठी तयार केलं आणि त्याने जर लस घेतली तर हॉटेलमध्ये जेवण देण्याची घोषणा सरकारने केली आहे. तुम्हाला जेवण नको असेल, तर तुम्ही तुमच्या आवडत्या सिनेमागृहात मोफत सिनेमा पाहू शकता. स्वित्झर्लंडने देशातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ही अनोखी ऑफर दिली आहे. स्वित्झर्लंडमध्ये लसीकरणाचा वेग कमी आहे.
लसीकरणाच्या विरोधात अनेक मोर्चे आणि आंदोलनं
स्वित्झर्लंडमध्ये लसीकरणाच्या विरोधात अनेक मोर्चे आणि आंदोलनं झाली होती. त्यामुळे लसीकरण करू नये अशा मताचे अनेक नागरिक देशात आहेत. यामुळे लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठणे सरकारला शक्य होत नसून अधिकाधिक वेगाने लसीकरण होण्यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे. देशात मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध असूनदेखील नागरिक लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारने दिलेल्या ऑफरनुसार, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या मित्राला किंवा इतर कुठल्याही लसीकरण न झालेल्या नागरिकाला लस घेण्यासाठी प्रवृत्त केलं, तर त्याला सरकार बक्षीस देणार आहे. यात मोफत भोजन करा किंवा मोफत चित्रपट पाहा असं सरकारनं म्हटलं आहे.
42 टक्के लोकांनी आतापर्यंत घेतलेली नाही लस
स्वित्झर्लंडमधील 8.7 मिलियन लोकसंख्येच्या 42 टक्के लोकांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही. युरोपातील सरासरीचा विचार करता हा आकडा गंभीर असून लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज व्यक्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 22,842 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 244 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,48,817 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील लसीकरणाने 90 कोटी डोस देण्याचा टप्पा पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.