इंग्लंडमध्ये लहान मुलांवर होणार कोरोना लसीचे प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:05 AM2020-06-01T05:05:43+5:302020-06-01T05:05:58+5:30
आॅक्सफर्ड विद्यापीठ करणार संयुक्तरित्या प्रयोग
लंडन : कोरोना विषाणूचा संसर्ग प्रौढांबरोबर लहान मुलांना झाला आहे. त्यामुळे या संसर्गाला प्रतिबंध करण्याकरिता लहान मुलांसाठीही लस शोधून काढणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी इंग्लंडमध्ये शाळा, बालवाड्या सुरू झाल्यानंतर त्यातील ५ ते १२ वर्षे वयोगटातील निवडक लहान मुलांवर लस टोचून प्रयोग करण्याचे आॅक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेसा पीएलसी यांनी संयुक्तरीत्या ठरविले आहे.
लहान मुलांना लस टोचल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता संशोधक घेणार आहेत.
कोरोना लसीचे बालकांवर प्रयोग नको असेही मत इंग्लंडमध्ये सध्या मांडले जात आहे. याबाबत लंडन स्कूल आॅफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेच्या व्हॅक्सिन सेंटरमधील प्राध्यापक बीएट कम्पमॅन यांनी सांगितले की, कोरोनासारख्या घातक आजारावर लहान मुलांसाठी प्रतिबंधक लस असणे आवश्यक आहे की नाही याचा पालकांनीच विचार करावा. कोरोनावरील लसीसाठी जगातील इतर लोक आपले योगदान देत असताना आपण व आपल्या पाल्याने शांत बसून राहायचे का याचाही पालकांनी विचार केला पाहिजे.
पालक भयभीत
आपल्या पाल्यांवर प्रयोग होणार या विचारांनी बालकांचे पालक निराश व भयभीत झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गाची लहान मुलांना फारशी लागण झालेली नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग फैलावण्यामध्ये ही मुले नेमकी कशा पद्धतीने भूमिका बजावतात, याचा अभ्यास अद्याप झालेला नाही.