CoronaVirus Updates: भयावह! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसमोर लस, बूस्टर डोस...सर्व फेल; WHO ने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:38 PM2021-11-27T12:38:06+5:302021-11-27T12:41:22+5:30
New Corona Variant: कोरोनाच्या डेल्डा व्हेरिअंटलाही याच वर्गामध्ये ठेवण्यात आले होते. हा व्हेरिअंटदेखील जगभरात वेगाने पसरू लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हाच डेल्टा व्हेरिअंट कारणीभूत होता.
जिनेवा : दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला कोरोनाचा नवीन व्हेरिअंट (New Corona Variant South Africa) जगात पुन्हा हाहाकार माजविण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओने या व्हेरिअंटला खूप वेगाने पसरणारे चिंताजनक स्वरुप असे म्हटले आहे. या व्हेरिअंटला ग्रीकमध्ये ‘ओमीक्रॉन’ नाव देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांनंतर ही पहिल्यांदा डब्ल्यूएचओने वर्गीकरणाची घोषणा केली आहे. (New Corona Variant)
कोरोनाच्या डेल्डा व्हेरिअंटलाही याच वर्गामध्ये ठेवण्यात आले होते. हा व्हेरिअंटदेखील जगभरात वेगाने पसरू लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हाच डेल्टा व्हेरिअंट कारणीभूत होता. यामुळे वेगाने पसरणारा आणखी एक धोकादायक व्हेरिअंट सापडल्याने हा व्हेरिअंट डेल्टापेक्षा जास्त धोकादायक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ओमीक्रॉनमुळे अनेक देशांना प्रभावित क्षेत्रातून प्रवासावर बंदी आणण्याची आवश्यकता भासली आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये देखील जोरदार घसरण झाली आहे.
बुस्टर डोसही फेल
कोरोनाचा b.1.1.529 व्हेरिअंट सापडल्याची घोषणा गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या वैज्ञानिकांनी केली होती. आता हा व्हेरिअंट अन्य दोन देश इस्त्रायल आणि बेल्जिअममध्येही सापडला आहे. हाँगकाँगमध्येही एक रुग्ण सापडला आहे. डब्ल्यूएचओनुसार आतापर्यंत या व्हेरिअंटच्या जवळपास 100 जीनोम सिक्वेंन्सिंगची सूचना मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हेरिअंटची लागण झालेल्या अनेकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले होते. त्याहून धक्कादायक म्हणजे इस्त्रायलच्या ज्या व्यक्तीला नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे त्याला बुस्टर डोसही मिळाला होता.
भारताने शुक्रवारी 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे नियमित सुरु करण्याची घोषणा केली आहे. परंतू नवा कोरोना व्हेरिअंट डेल्टा किंवा आधीच्या कोरोना विषाणूंपेक्षा जास्त वेगाने पसरत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना लस घेतलेले लोकही या व्हेरिअंटने बाधित होणार आहेत. यामुळे कोरोना लसीच्या प्रभावावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संबंधित बातम्या..