Coronavirus : कोरोनाचे विषाणू १३ देशांमध्ये; राज्यात चार संशयित रुग्ण; देशात तिघे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:38 AM2020-01-28T05:38:16+5:302020-01-28T05:38:35+5:30
Coronavirus News : मुंबईत सोमवारी एक तर पुण्यात दोन संशयीत रुग्ण आढळले.
बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्गामुळे आतापर्यंत ८९ जण मरण पावले असून, तीन हजार जणांना त्याची लागण झाली आहे. मंगोलियाने चीनला लागून असलेल्या सर्व सीमा बंद केल्या असून, आॅस्ट्रेलिया, अमेरिका, मकाऊ, तैवान, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, मलेशिया, फ्रान्स, कॅनडा, व्हिएटनाम व नेपाळ या १२ देशांमध्येही कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
चीनच्या सीमा अरुणाचल व भूतानकडून भारताला जोडल्या गेल्या आहेत. नेपाळमध्येही कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतात चीन व नेपाळसह वरील सर्व देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. काही जण चीनहून अन्य देशांच्या मार्गे परतत असल्याने त्यांच्यावरही देखरेख ठेवण्यात येत आहे.
मुंबईत सोमवारी एक तर पुण्यात दोन संशयीत रुग्ण आढळले. याखेरीज आधीच्या संशयीत रुग्णाला पुन्हा देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आधीच्या तीन संशशियांपैकी कोणालाही लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र केरळमध्ये एक व राजस्थानमध्ये दोन संशयीत आढळले असल्याचे समजते.
चीनमधील वुहान प्रांतात सुमारे ७00 भारतीय होते. त्यात नोकरी करणारे तसेच विद्यार्थी होते. त्यापैकी अनेक जण आधीच परतले असले तरी सुमारे २५0 जण अद्याप वुहानमध्ये असल्याचे सांगण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भारताच्या चीनमधील दुतावास त्यांच्या संपर्कात आहेत.
जे भारतीय तिथे नोकरी करतात, पण ज्यांचे पासपोर्ट कार्यालयांकडे जमा आहेत, त्यांनाही पासपोर्ट शिवाय देशात आणण्याची व्यवस्था भारतातर्फे केली जाणार आहे. (वृत्तसंस्था)
भारतीयांना आणण्यास विमान तयार
एअर इंडियाने एक विमान चीनमधून परत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी राखून ठेवले आहे. गरजेनुसार ते पाठवण्यात येणार आहे. चीनमधील १७ शहरे बंद करण्यात आली आहे आणि तिथे सर्वत्र सुटी जाहीर करण्यात आली आहे. लोकांना बाहेर पडण्यास बंदी असून, त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात अडचणी येत आहे. या शहरांमध्ये सध्या शुकशुकाट आहे.