Corona Virus : रशियामध्ये चोवीस तासांत कोरोनाचे ४० हजार रुग्ण, मॉस्कोसह अनेक शहरांत कडक निर्बंध लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 06:02 AM2021-10-29T06:02:25+5:302021-10-29T06:02:55+5:30
Corona virus: रशियाने स्वत: काही कोरोना प्रतिबंधक लसी विकसित केल्या आहेत. मात्र तरीही त्या देशातील लसीकरण मोहिमेचा वेग कमी आहे. त्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी अवघ्या ३२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
मॉस्को : गेल्या चोवीस तासांत रशियामध्ये कोरोनाचे ४० हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले असून, १,१५९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मॉस्को व रशियातील अन्य शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता अनेक व्यवहार सध्या बंद ठेवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी मर्यादित संख्येने लोकांना प्रवेश देण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
रशियाने स्वत: काही कोरोना प्रतिबंधक लसी विकसित केल्या आहेत. मात्र तरीही त्या देशातील लसीकरण मोहिमेचा वेग कमी आहे. त्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी अवघ्या ३२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. रशियामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख ३५ हजार ५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या युरोप खंडातील कोरोना बळींपेक्षा कितीतरी जास्त आहे. येत्या शनिवार, दि. ३० ऑक्टोबरपासून ते ७ नोव्हेंबर या कालावधीत रशियामध्ये सरकारी व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे.
रशियाच्या नागरिकांना इजिप्त पर्यटनाचे वेध
रशियाच्या दक्षिण भागामध्येही कोरोना प्रतिबंधक कडक निर्बंध लागू झाले असले तरी तेथील अनेक नागरिकांना पर्यटनासाठी विदेशात जाण्याची इच्छा आहे. इजिप्तच्या पर्यटनासाठी रशियातील कित्येक नागरिकांनी बुकिंग केले आहे. जगात कोरोना लसीला मान्यता देण्याचा मान सर्वप्रथम रशियाने मिळविला होता.