Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये रुग्णालयात वेटिंग, मृतदेहांचा ढीग; स्मशानात रांगा, परिस्थिती भीषण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 05:51 PM2022-12-23T17:51:42+5:302022-12-23T17:57:58+5:30
China Corona Virus : चीनमधील अनेक रुग्णालयांत डॉक्टर कमी आणि रुग्णांची संख्या जास्त अशी समस्या पाहायला मिळत आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती बिघडत आहे. चीनमध्ये फक्त रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर्स, औषधांची मोठी कमतरता नाही तर डॉक्टर आणि मेडिकल स्टाफचा देखील तुटवडा आहे. चीनी रिपोर्टमध्ये हा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. चीनमध्ये मोठ्या संख्येने मेडिकल स्टाफ हा संक्रमित झाला आहे. त्यामुळेच ते परत रुग्णालयात येण्याची आशा ही कमी आहे,
चीनी मीडियातील रिपोर्टनुसार, चीनमधील अनेक रुग्णालयांत डॉक्टर कमी आणि रुग्णांची संख्या जास्त अशी समस्या पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे चीनमधील हेल्थ एक्सपर्ट लोकांना माध्यमांच्या मार्फत रुग्णालयातील गर्दी वाढवू नका असं आवाहन करण्यात येत आहे. संक्रमित झाल्यानंतर स्वत: ला घरामध्ये आयसोलेट करा. घरामध्येच फ्लूवरची औषधं घेऊन उपचार करा असं सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चीनमध्ये औषधांचा तुटवडा पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.
चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी शिथिल करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. संक्रमित लोकांना इब्रुप्रोफेन आणि एसिटामिनोफेन सारखं सामान्य औषध देखील मिळत नाही. चीनने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एकही बेड उपलब्ध नसल्याने जमिनीवर रुग्णांना ठेवून उपचार केले जात आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढल्याने शवागृहही भरली आहेत. मृतदेहांचे ढीग पाहायला मिळत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे.
कोरोना पसरताच पुन्हा आधीचीच चूक करतोय चीन; जगाला महागात पडू शकते 'ही' लपवा-छपवी
चीनने यावेळी कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा लपवण्यासाठी आता नवीन पद्धत शोधून काढली आहे. आपली वेगळी गाईडलाईन तयार केली आहे. श्वासासंबंधीत आजाराने रुग्णांचा मृत्यू झाला तरच कोरोनाने मृत्यू झाल्याचं मानलं जाईल असं त्यामध्ये म्हटलं आहे. तसेच इतर गोष्टींचा त्यामध्ये समावेश नाही. चीनचं हे संकट जगासाठी येणाऱ्या काळात कसं संकट बनू शकतं. यावर वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक आर्टिकल छापण्यात आलं आहे. यामध्ये तसेच चीनचं सरकार हे आकडे लपवण्यासाठी ओळखलं जातं असं म्हटलं आहे. तसेच रुग्णांची नेमकी संख्या, मृतांचा आकडा हे सर्व कन्फ्यूजन असल्याचं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"