Corona Virus : भयावह वेग! चीनमध्ये एका दिवसात तब्बल 3 कोटी 70 लाख लोकांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:11 PM2022-12-24T12:11:51+5:302022-12-24T12:19:28+5:30
China Corona Virus : चीनच्या बीजिंग, सिचुआन, अनहुई, हुबेई, शांघाई आणि हुनानमध्ये स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. चीन सरकारच्या सर्वोच्च आरोग्य प्राधिकरणाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात एका दिवसात चीनमध्ये सुमारे 3 कोटी 70 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे आकडे जगभरात केलेल्या दाव्यांपेक्षा जास्त आहेत. बुधवारी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अंतर्गत बैठकीच्या मिनिटांनुसार डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांत किमान 248 मिलियन लोकांना म्हणजेच जवळपास 18% लोकसंख्येला या व्हायरसची लागण झाली असण्याची शक्यता आहे.
जर ही आकडेवारी बरोबर असेल तर जानेवारी 2022 मध्ये एका दिवसातील सुमारे 4 मिलियन संसर्ग दराचा विक्रम मोडेल. बीजिंगचे झिरो कोविड धोरण रद्द केल्यामुळे लोकसंख्येमध्ये अत्यंत संसर्गजन्य कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने प्रसार झाला आहे. एजन्सीच्या अंदाजानुसार, चीनच्या नैऋत्येकडील सिचुआन प्रांत आणि राजधानी बीजिंगमधील निम्म्याहून अधिक रहिवाशांना संसर्ग झाला आहे. चीनमधील लोक आता संसर्गाचा शोध घेण्यासाठी रॅपि़ड अँटीजन टेस्टचा वापरत आहेत.
चीनच्या अनेक शहरांत परिस्थिती बिकट
सरकारने कोरोना बाधित रुग्णांची दैनंदिन संख्या प्रकाशित करणे बंद केले आहे. ऑनलाइन कीवर्ड शोधांच्या विश्लेषणाच्या आधारे, डेटा कन्सल्टन्सी मेट्रोडेटाटेकचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ चेन किन यांनी सांगितले की चीनमधील बहुतेक शहरे डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या अखेरीस शिखरावर असतील. त्यांचे मॉडेल दर्शविते की शेन्झेन, शांघाई आणि चोंगकिंग शहरांमध्ये लाखो लोकांना संसर्ग झाला आहे. चीनच्या बीजिंग, सिचुआन, अनहुई, हुबेई, शांघाई आणि हुनानमध्ये स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
बीजिंगमध्ये संसर्गाचे प्रमाण 50 ते 70 टक्के
सतत बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्यांदाच शनिवारी किंवा रविवारी कोविड आढावा बैठक घेऊ शकतात अशी बातमी येत आहे. या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग चीनमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे. बीजिंगमध्ये संसर्गाचे प्रमाण 50 ते 70 टक्के असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शांघाईमध्ये, पुढील आठवड्यापर्यंत अडीच कोटी लोक कोरोना पॉझिटिव्ह असू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"