Corona Virus: चीननंतर इटलीत कोरोनाची दहशत; एका दिवसात तब्बल ३६८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 11:38 AM2020-03-16T11:38:34+5:302020-03-16T11:41:49+5:30
Corona Virus: इटलीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील अन्य देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. चीनपाठोपाठइटलीमध्येकोरोना व्हायरसमुळे अनेक जणांचे प्राण गेले आहेत. आशियातील चीन हा कोरोनाचा केंद्रबिंदू होता तर युरोपातील इटलीवर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेला आहे.
इटलीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. एका दिवसात इटली कोरोनामुळे इतके लोक मृत्यू झाले जेवढे दुसऱ्या महायुद्धातही एका दिवसात झाले नाहीत. रविवारी दिवसभरात २४ तासांत इटलीत ३६८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांचा हा आकडा सगळ्यात मोठा आहे. याच्या एक दिवसाअगोदरच इटलीत २५० जणांचा जीव गेला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आकडा इटलीत किती भयंकर आहे याची कल्पना देते.
जर दुसऱ्या महायुद्धात एका दिवसात झालेल्या मृत्यूची तुलना केल्यास कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. महायुद्धात एका दिवसात जवळपास २०७ लोक मारले गेले. तर कोरोनामुळे एका दिवसात २५० आणि ३६८ हा आकडा गाठला. ६ वर्ष सुरु असलेल्या महायुद्धाची तुलना कोरोना व्हायरसची होऊ शकत नाही. मात्र सरासरी मृत्यूंचा आकडा पाहायला गेला तर कोरोनाची व्याप्ती किती गंभीर आहे हे इटलीत दिसून येत आहे.
कोरोनामुळे जगभरात १ लाख ६९ लोक बाधित झाले आहेत. यातील ६५०० लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. चीनमध्ये ३२०० तर इटलीत १८०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात ११२ जणांना कोरोनाची लागण झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, दिल्लीतील कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आलं आहे. बाहेर ज्याप्रकारे कोरोना व्हायरसबाबत सांगितलं जात आहे तेवढा हा आजार भयंकर नाही. या आजारात कोण लोक मरत आहेत याची माहिती देण्यात येत नाही. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना या आजाराचा धोका आहे. सामान्य व्हायरस ४-५ दिवसात बरा होतो तर कोरोनासाठी १५-१६ दिवस लागतात. आवश्यक उपचार घेतल्यानंतर कोरोना पूर्णपणे बरा होता. १४ दिवस घरात राहावं लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेर जावू नये अशी सूचना देण्यात आली आहे असं रोहित दत्ता यांनी सांगितले आहे.