Corona Virus : युरोपवर पुन्हा कोरोनाचे भूत, जागतिक आरोग्य संघटनेची चिंता; भारतातही खबरदारी आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 05:30 AM2021-10-30T05:30:16+5:302021-10-30T05:30:58+5:30
Corona Virus :भारतातही गणेशोत्सवापासून सणासुदीचा काळ सुरू झाला असून, लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. ते गर्दी करीत आहेत, मास्कचा वापरही आता कमी झाला आहे, काही राज्यांत अद्याप अधिक रुग्ण सापडत आहेत दिवाळी सुरू होण्याआधीच ही परिस्थिती आहे.
न्यूयॉर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे, असे वाटत असले तरी प्रत्यक्ष स्थिती तशी नाही. युरोपमध्ये कोविडच्या रुग्णांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली असून, सर्वच देशांनी संसर्ग वाढू नये, यासाठी अधिक काळजी व खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
भारतातही गणेशोत्सवापासून सणासुदीचा काळ सुरू झाला असून, लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. ते गर्दी करीत आहेत, मास्कचा वापरही आता कमी झाला आहे, काही राज्यांत अद्याप अधिक रुग्ण सापडत आहेत दिवाळी सुरू होण्याआधीच ही परिस्थिती आहे. दिवाळीच्या काळात अधिक सावध राहायला हवे, असे आवाहन केंद्र व राज्य सरकारने केले आहे.
युरोपमध्ये गेल्या आठवड्यात महामारीचे सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू झाले असून आहेत. इंग्लड वगळता युरोपात गेल्या आठवड्याच्या तुलनेत आता १९ टक्क्यांनी वाढले आहेत. सलग चार आठवडे युरोपात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आशियामध्येही काही प्रमाणात रुग्णवाढ सुरू झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फारच वाढल्याने अनेक शहरे जणू पूर्णपणे बंद केली आहेत. तब्बल ४० लाख लोकांना घराच्या बाहेर पडण्यास बंदी घातली आहे.
मृतांच्या संख्येत १४ टक्के वाढ झाली आहे, असे आरोग्य संघटनेने साप्ताहिक अहवालात म्हटले आहे. अमेरिका, ब्रिटनमध्ये लोकच अधिक खबरदारी बाळगताना दिसत आहेत. भारतात मात्र लोक काळजी घेत नाहीत, असे दिसून आले आहे.
आजार संपलेला नाही; तज्ज्ञांचे प्रतिपादन
भारतात सध्या १ लाख ६१ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेले सलग ३५ दिवस रोजच्या नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आत असून, गेले काही दिवस ती २० हजारांपेक्षाही कमी झाली आहे. देशामध्ये कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१९ टक्के आहे.