Corona Virus: चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 70 जण अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 10:50 PM2020-03-07T22:50:56+5:302020-03-07T22:52:41+5:30
Corona Virus: सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार या हॉटेलमध्ये 80 खोल्या होत्या. शोध मोहिमेत आतापर्यंत 23 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
बीजिंग - कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या चीनमध्ये मोठा अपघात झाला आहे. चीनमधील क्वानझोऊ शहरात हॉटेलची इमारत कोसळली असून, त्यात सुमारे 70 जण ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भीती आहे. या हॉटेलमध्ये कोरोना व्हायरस पीडितांवर उपचार सुरु होते. या रूग्णांच्या उपचारासाठी ही इमारत तात्पुरती रुग्णालय म्हणून वापरली जात होती.
सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार या हॉटेलमध्ये 80 खोल्या होत्या. शोध मोहिमेत आतापर्यंत 23 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता ही घटना घडली असून बचाव व मदतकार्य सध्या सुरू आहे. सिन्हुआच्या म्हणण्यानुसार, बचाव आणि मदत कार्यासाठी 147 सदस्यांची टीम पाठविली गेली आहे, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.