Corona Virus : अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! संसर्ग वाढला; रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, पुन्हा परतला व्हायरस?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 01:05 PM2023-08-01T13:05:50+5:302023-08-01T13:14:04+5:30
Corona Virus : कोरोनाचे 7,100 हून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. तर आठवडाभरापूर्वी ही संख्या 6,444 होती
अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने दिलेली माहिती खूपच भयावह आहे. CDC म्हणतं की 15 जुलैपर्यंत, कोरोनाचे 7,100 हून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. तर आठवडाभरापूर्वी ही संख्या 6,444 होती. सीडीसीने इशारा दिला की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. हा आकडा गेल्या वर्षी डिसेंबरनंतरचा उच्चांक आहे.
CDC नुसार, 21 जुलैपर्यंत, इमर्जन्सीसाठी येणाऱ्या लोकांपैकी सरासरी 0.73 टक्के लोकांना कोरोना होता. तर 21 जूनपर्यंत ही संख्या केवळ 0.49 टक्के होती. अटलांटामधील सीडीसी अधिकारी डॉ. ब्रेंडन जॅक्सन म्हणाले, 'सुमारे सहा, सात महिन्यांच्या सततच्या घसरणीनंतर, जेव्हा गोष्टी पुन्हा सुधारू लागल्या, पण आता आकडेवारी वाढली. गेल्या काही आठवड्यांपासून यात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. या आठवड्यात, प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच, रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या संख्येतही वाढ पाहिली.
हॉस्पिटलायझेशन वाढले आहे, तरीही गेल्या वर्षी त्याच वेळी नोंदवलेल्या पातळीपेक्षा कमी आहे. जुलै 2022 मध्ये, एका आठवड्यात किमान 44,000 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. यापैकी पाच टक्के कोरोनाशी संबंधित आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, यावेळी रुग्ण एका सुपर ट्रान्समिसिबल प्रकारामुळे रुग्णालयात येत आहेत. CDC चे सध्याचे अंदाज सूचित करतात की XBB व्हेरिएंट ज्याने गेल्या हिवाळ्यात संसर्ग झाला होता तो यावेळी पसरत आहे.
अमेरिकेत कोरोनाचा दर अजूनही 'ऐतिहासिक नीचांकी' पातळीवर आहे. यामुळे तज्ज्ञांना काहीसा दिलासा मिळत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार देशातील एकूणच संसर्ग-संबंधित मृत्यू कमी होत आहेत आणि सीडीसीने त्यांचा मागोवा घेण्यास सुरुवात केल्यापासून सर्वात कमी दर आहे. एनवाययू लँगोन मेडिकल सेंटरमधील मेडिसिन प्रोफेसर डॉ. मार्क सिगल यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, उन्हाळा सुरू आहे. त्यामुळेही रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.