Corona Virus: जगभरात बळींची संख्या चार हजारांवर; इराणमध्ये मृतांची संख्या २९१ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:57 AM2020-03-11T04:57:07+5:302020-03-11T06:40:12+5:30
कोरोनासारख्या खतरनाक विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगलने सोमवारपासून सिलिकॉन व्हॅली, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क येथील कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे मंगळवारी आणखी १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे देशातील बळींची संख्या आता ३१३६ झाली आहे. या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ४०११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूची लागण आतापर्यंत एक लाख १० हजार नागरिकांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॅनडात पहिला बळी
कोरोनाने कॅनडात पहिला बळी घेतला आहे. पश्चिमी प्रांतातील ब्रिटिश कोलंबियाच्या आरोग्य अधिकारी बोनी हेनरी यांनी पत्रकारांना सांगितले की, एका ज्येष्ठ नागरिकाची सेवा करणाऱ्या व्यक्तीचे सोमवारी रात्री कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. कॅनडात आतापर्यंत ७० रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले असून, सर्वांत जास्त रुग्ण हे ब्रिटिश कोलंबिया आणि ओंटारियो भागातील रहिवासी आहेत.
कू्रझवरील ३५०० प्रवाशांची सुटका
ओकलैंड (अमेरिका) : कोरोना संसर्गामुळे पीडित असलेल्या कू्रझवरील ३५००हून अधिक प्रवाशांची सोमवारी सुटका करण्यात आली. हे जहाज ओकलैंड येथील कॅलिफोर्निया बंदरावर पोहोचले आहे. यामध्ये २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाकीच्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी सैन्य शिबिरात ठेवण्यात येणार असल्याचे गव्हर्नर गाविन न्यूसोम यांनी सांगितले.
कोरोनावर चेष्टा करणे पडले महाग
जोहान्सबर्ग : कोरोना संसर्गासंबंधी चेष्टा करणे मूल भारत निवासी असलेल्या दोन दक्षिणी आफ्रिकन नागरिकांना महागात पडले आहे.
पहिली घटना अशी, भारतातून डरबन येथे आलेल्या ५५ वर्षीय महिलेने दावा केला होता की, त्या कोरोना पीडित आहेत. यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले; परंतु सर्व तपासण्याअंती त्यांना कोरोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले. यावर तिने आपण चेष्टा करत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. मात्र, पोलीस चौकशीत त्या एका फसवणूकप्रकरणी होणाºया अटकेतून वाचण्यासाठी हा प्रकार करीत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. दुसºया घटनेत, एका स्पोर्टस् कारच्या मालकाने नंबरप्लेटवर ‘कोविड १९-जेडएन’ लिहिले आहे. यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
सिडनी : कोरोनाच्या धास्तीने आॅस्ट्रेलियातील क्वाटास विमान कंपनी १० डबल-डेकर असलेल्या ए ३८० मधील एकूण आठ विमानांची सेवा बंद करणार आहे.
चीनमध्ये १०० वर्षांचा वृद्ध कोरोनामधून बरा
वयाचा १०० वा वाढदिवस साजरा केल्यानंतर कोरोना विषाणूची लागण झालेला व्यांग नावाचा वृद्ध बरा झाला आहे. त्याला स्मृतीभ्रंश (अल्झायमर) चा त्रास आहे. वुहानमधील हुबेई येथील रुग्णालयात शनिवारी ज्या ८० रुग्णांना घरी पाठविण्यात आले त्यामध्ये व्यांगचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोनाच्या धास्तीने ‘गुगल’मध्ये प्रवेश बंद
कोरोनासारख्या खतरनाक विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगलने सोमवारपासून सिलिकॉन व्हॅली, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क येथील कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. यापूर्वी अॅपल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनसारख्या अनेक आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘अॅपल’ने तर एप्रिलमध्ये होत असलेल्या प्रतिष्ठित अशा व्यापार संमेलनाचे आयोजनही पुढे ढकलले आहे. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी गुगलच्या काही कार्यालयांत बाहेरच्या व्यक्तींना आणि सहलीवर येत असलेल्या लोकांना प्रवेश बंद करण्यात आला असून भविष्यातील नोकरभरतीच्या मुलाखती या ‘व्हर्चुअल’च्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.