कोरोना विषाणूचा संसर्ग हे तर हिमनगाचे टोक; विषाणूतज्ज्ञाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:25 PM2020-05-27T23:25:02+5:302020-05-27T23:26:32+5:30
पुन्हा साथीचा धोका
बिजिंग : जगामध्ये सध्या हाहाकार माजवत असलेला कोरोनाचा विषाणू हे तर हिमनगाचे टोक आहे. वन्यप्राण्यांच्या शरीरात असलेल्या विषाणूंमुळे भविष्यात आणखी संसर्गजन्य आजार उद्भवू शकतात, असा इशारा वटवाघळांतील कोरोना विषाणूंच्या अभ्यासामुळे बॅटवूमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या विषाणूतज्ज्ञ शि झेंगली यांनी दिला आहे.
चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, विषाणूंवर संशोधन करण्यासाठी विविध सरकारे व शास्त्रज्ञांची धोरणे पारदर्शक असली पाहिजेत. त्यांनी संशोधनात परस्परांना सहकार्य केले पाहिजे. विज्ञानाचे होणारे राजकीयीकरण खेदजनक आहे.
वुहानमधून कोरोनाच्या संसर्गास सुरुवात होऊन त्याची साथ जगभर पसरली.
विषाणू वुहानमधील प्रयोगशाळेत बनविल्याचा, तसेच चीनने कुटील हेतूने या विषाणूची साथ जगभर पसरविली असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. त्याचा चीनने याआधीच स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शि झेंगली यांनी काढलेले उद्गार सूचक आहेत. त्या म्हणाल्या की, अज्ञात विषाणूंमुळे होणाºया संसर्गजन्य आजारांपासून माणसाला वाचवायचे असेल, तर वन्यप्राण्यांमध्ये असलेल्या विषाणूंचा बारकाईने अभ्यास व्हायला हवा. त्यांच्याकडून होऊ शकणाºया संसर्गाबद्दल आगाऊ सूचना सर्वांना देण्यात यावी. आपण याविषाणूंचा अभ्यास केला नाही, तर कोरोना विषाणूसारखी आणखी दुसरी साथ भविष्यात पुन्हा येण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
विषाणूच वेगळा
वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीच्या उपसंचालक असलेल्या शि झेंगली यांनी सांगितले की, वटवाघळातल्या ज्या कोरोना विषाणूंचा मी अभ्यास केला त्यांच्याशी सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचे अजिबात साम्य नाही. हा विषाणू वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीमध्ये तयार करण्यात आला. तसेच, प्रयोगशाळेतील एका अपघातामुळे कोरोनाचा विषाणू वातावरणात मिसळला या आरोपांत काहीही तथ्य नसल्याचे वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजीच्या संचालक वांग यानयी यांनीही नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते.