Corona virus : आधीच आर्थिक मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या वाहन उद्योगाला आता कोरोनाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 07:47 PM2020-03-25T19:47:25+5:302020-03-25T19:53:35+5:30
मार्च महिन्यामध्ये वाहन खरेदी तुलनेने होते अधिक
पुणे : गेले वर्षभर मंदीच्या छायेत असलेल्या वाहन उद्योगाला कोरोनाच्या प्रसारामुळे दुहेरी फटका बसला आहे. गेल्या दोन दशकातील वाहन उद्योगा समोरील हा सर्वात कठीण काळ मानला जात आहे. वाहनांची देशातील आणि परदेशातील मागणी घटली आहे. तसेच वितरण साखळी विस्कळीत झाल्याने त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे.
सोसायटी ऑफ इंडियन मॅन्युफॅक्चररचे अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले कोरोनाच्या प्रसारामुळे जागतिक वितरण साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे काही काळासाठी वाहन उत्पादन बंद ठेवावे लागेल.
मार्च महिन्यामध्ये वाहन खरेदी तुलनेने अधिक होते. देशभरात या कालावधीत संचारबंदी आणि जमाव बंदी लागू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. २४ ) देशभरात २१ दिवसांचा लॉक डाऊन (सर्व व्यवहार ठप्प) जाहीर केला आहे. पुण्यासारख्या शहरात तर खासगी वाहनांना पेट्रोल देण्यास निर्बंध घातले आहेत. या परिस्थितीमुळे वाहन विक्रीवर साहजिकच विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे बीएस- ४ वाहने 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्याच्या निर्णयास मुदतवाढ देण्याची मागणी फेडरेशन आॅफ आॅटोमोबाईल डिलर्स असोसिएशन च्या वतीने करण्यात आली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हर्षराज काळे म्हणाले, कोरोनाची साथ आपल्या नियंत्रणा बाहेर गेली आहे. वाहन विक्रीची दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे बीएस 4 वाहन विक्रीची मुदत 31 मार्च ऐवजी 31 मे 2020 केली पाहिजे.
वाहनांच्या सुट्या भागांची आयात थंडावली
इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग अथोरिटी (आयसीआरए) नुसार 4.8 अब्ज डॉलर किमतीच्या वाहनांच्या सुट्या भागांची भारतात आयात केली जाते. त्यामध्ये चीनचा वाटा तब्बल 27 टक्के इतका आहे. चीन आणि दक्षिण पूर्व आशियाई देशातून वाहनांचे सुटेभाग मोठ्या प्रमाणावर येतात. कोरोनाच्या प्रसारामुळे ही व्यापार साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. फ्युएल इंजेक्शन पंप, इ जी आर मोड्युल, इलेक्ट्रॉनिक भाग, टर्बो चार्जर, आशा विविध साहित्याचा यात समावेश आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ही वितरण साखळी चीनवर अवलंबून आहे.
................
- वाहनांच्या सुट्या भागांची 4.8 अब्ज डॉलरची भारतात होते आयात
- एकूण आयातीमध्ये चीनचा वाटा 27 टक्के
- लॉक डाऊनमुळे वाहन विक्री बंद
- बीएस 4 वाहन विक्रीची मुदत वाढविण्याची मागणी
............................
चीन इटलीसह काही देशातून मांस आयात करण्यावर निर्बंध
कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, युरोपियन महासंघातील देशातून जनावरे, मांस आणि मासे आयात करण्यास तात्पुरते निर्बंध घातले असल्याचे जागतिक व्यापार संघटनेने (डब्लूटीओ) जाहीर केले आहे.