Corona Virus: एवढ्यात सुटका नाही? कोरोना अजून वाढणार, ओमायक्रॉननंतर आणखी व्हेरिएंट येणार, तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:04 PM2022-01-16T23:04:30+5:302022-01-16T23:05:18+5:30
Corona Virus: Omicron हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नसेल. तर कोरोनाचे अजूनही काही व्हेरिएंट येणार, असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, प्रत्येक संसर्ग विषाणूला म्युटेशन करण्याची क्षमता बाळगतो.
बोस्टन - सुरुवातीला कोरोना, नंतर डेल्टा, आता ओमायक्रॉन, कोरोनाच्या साथीमुळे वेगवेगळे व्हेरिएंट संपूर्ण जगामध्ये लोकांची झोप उडवत आहेत. आता हा विषाणू जगातील लोकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. कोरोना विषाणूबाबत अभ्यासामधून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. आता तर कोरोना विषाणूबाबत तज्ज्ञांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नसेल. तर कोरोनाचे अजूनही काही व्हेरिएंट येणार, असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, प्रत्येक संसर्ग विषाणूला म्युटेशन करण्याची क्षमता बाळगतो. ओमायक्रॉन स्वत:ला वाढवू शकतो. त्यांनी सांगितले की, व्हॅक्सिन आणि नैसर्गिकरीत्या मिळालेल्या इम्युनिटीनंतरही हा विषाणू लोकांना बाधित करत आहे. याचा अर्थ हा आहे की, हा विषाणू अधिकाधिक लोकांमध्ये पुढेही विकसित होऊ शकतो.
मात्र तज्ज्ञांनी हेही सांगितले आहे की, त्यांना कोरोनाच्या पुढच्या व्हेरिएंटमध्ये कशाप्रकारची लक्षणे दिसतील याबाबत माहिती नाही आहे. ओमायक्रॉनच्या दुसऱ्या टप्प्यात येणारी साथ हा एक सौम्य आजार असेल आणि लसीकरण त्याविरोधात काम करेल, याची काहीही हमी देता येत नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
बोस्टन विद्यापीठाचे साथरोगतज्ज्ञ लियोनार्डो मार्टिनस यांनी सांगितले की, वेगाने पसरत असल्याने ओमायक्रॉनला अधिक म्युटेशन तयार करण्याची संधी मिळेल. त्यामुळे अधिकाधिक व्हेरिएंट येण्याची शक्यता वाढणा आहे. नोव्हेंबरच्या मध्यामध्ये हा व्हेरिएंट सापडल्यापासून जगभरात तो आगीसारखा पसरला आहे. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएँटच्या तुलनेत चारपट अधिक गतीने बाधित करतो, असे संशोधनामधून समोर आले आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील साथरोज आजार तज्ज्ञ डॉ. स्टुअर्ट कॅम्बेल यांनी सांगितले की, सातत्याने आणि दीर्घकाळापर्यंत संसर्ग झाल्यामुळे नव्या व्हेरिएंटच्या निर्मितीची शक्यता निर्माण होत आहे.