'या' देशात कोरोना नाही पण तरी लागला कडक लॉकडाऊन; लोकांना श्वास घ्यायला होतोय त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 03:51 PM2023-01-26T15:51:34+5:302023-01-26T16:02:22+5:30
श्वसनाच्या आजारामुळे पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये श्वसनाच्या आजारामुळे पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान सर्व लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच राजधानीत उपस्थित असलेल्या परदेशी दूतावासांनाही सरकारच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका वृत्तसंस्थेने सरकारी सूचनेचा हवाला देत म्हटले आहे की त्यात कोविड-19 चा उल्लेख नाही पण लोकांना रविवारच्या अखेरपर्यंत घरातच राहावे लागेल असे म्हटले आहे.
लोकांना त्यांच्या बॉ़डी टेम्परेचरची माहिती द्यावी लागेल.लॉकडाऊनचा निर्णय पाहता लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला आहे. अचानक लॉकडाऊनची बातमी आल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्योंगयांग व्यतिरिक्त इतर भागातही लॉकडाऊन आहे की नाही याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. उत्तर कोरियामध्ये कोरोना बाधित रुग्ण समोर आले होते. मात्र सरकारने त्यावर नियंत्रण आणल्याचे सांगण्यात आले. तरीही किती लोकांना कोरोनाची लागण झाली. याबाबत कोणतीही स्पष्ट आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
कोरोनाच्या काळातही आपली आकडेवारी लपवण्याचे काम उत्तर कोरियाने केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियामध्ये कोरोना चाचणीसाठी कोणतीही विशेष व्यवस्था नाही. मशिन्सही नाहीत. अशा परिस्थितीत, दैनिक कोविड पॉझिटिव्ह अहवाल जारी केला गेला नाही. तरी किती लोक तापाने त्रस्त आहेत. त्याचा दैनंदिन अहवाल देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, 2.5 कोटी लोकसंख्येपैकी 47.7 लाख लोक तापाने त्रस्त होते.
स्थानिक माध्यमांनी निश्चितपणे फ्लूसह श्वसन रोगांशी लढण्यासाठी महामारीविरोधी उपायांबद्दल अहवाल प्रकाशित केले आहेत. मात्र लॉकडाऊनबाबत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या महामारीविरोधी नियमांचे पालन करणे आवश्यक करण्यात आले आहे. रुग्णालयांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून श्वसनाचे वाढते आजार आटोक्यात आणता येतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"