Corona Virus : कोरोनाचा खात्मा सहज शक्य, पण कराव्या लागतील 'या' दोन गोष्टी; WHO नं सांगितला 'महामंत्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:45 PM2022-01-12T13:45:16+5:302022-01-12T13:45:55+5:30
जागतिक आरोग्य संखटनेचे प्रमुख (WHO) टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारी संपवणे शक्य आहे. पण...
कोरोना विषाणूचा (Corona Virus) ओमायक्रॉन प्रकार समोर अल्यापासून जगभरातील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढू लागली आहे. देशातही गेल्या 24 तासांत 1,94,720 नवे करोना रुग्ण समोर आले आहेत. यामुळे आता देशातील संसर्ग दर 11.05 टक्क्यांवर पोहोचला आहेत. सध्या देशात 4868 जणांना Omicronचा संसर्ग झाला आहे. जगात कोरोनाची ही नवी लाट आली असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा सर्व देशांना लस पुरविण्यासंदर्भात भाष्य केले आहे.
जागतिक आरोग्य संखटनेचे प्रमुख (WHO) टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारी संपवणे शक्य आहे, पण यासाठी काही कठोर पावले उचलावी लागतील. टेड्रोस अधानोम म्हणाले, "कोरोनावर निश्चितपणे मात केली जाऊ शकते, परंतु यासाठी जगभरातील सर्व सरकारे आणि लस उत्पादकांना 2 गोष्टींची खात्री द्यावी लागेल. एक म्हणजे, ज्या देशांमध्ये लस पोहोचत नाही, परंतु तेथे कोरोनाचा धोका आहे, अशा देशांना लसींचा पुरवठा वाढविला जाईल आणि दुसरे म्हणजे, लोकांना लस देण्यासाठी आवश्यक संसाधने पुरेशा प्रमाणात पुरविली जातील. जोवर प्रत्येकजण सुरक्षित नाही, तोवर आपण कुठेही सुरक्षित नाही.
We can end the #COVID19 pandemic but governments and manufacturers must:
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) January 10, 2022
-Increase vaccine supplies to countries at risk with low coverage
-Ensure the resources needed to get jabs in arms
We are not safe anywhere until we are safe everywhere. #VaccinEquityhttps://t.co/8zbFk52UxI
डब्ल्यूएचओ प्रमुख 2021 मधील आपल्या अखेरच्या भाषणातही म्हणाले होते की, "कोणताही देश या महामारीपासून वाचलेला नाही. आमच्याकडे कोरोनाला रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी अनेक नवीन साधने आहेत. लसीची असमानता (अनेक लहान किंवा गरीब देशांत लस न पोहोचणे) जेवढ्या अधिक काळ सुरू राहील, तेवढाच हा विषाणू विकसित होण्याचा धोकाही अधिक असेल. त्याला आपण रोखू शकत नाही. आपण लसीची असमानता संपवली, तर आपण या महामारीचाही अंत करू शकू."