Corona Virus: कोरोनाच्या दहशतीमुळे ब्रिटनच्या राणीने सोडला राजमहाल; 'या' ठिकाणी करणार वास्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 08:12 AM2020-03-16T08:12:40+5:302020-03-16T08:35:31+5:30
'द सन' या दैनिकाच्या वृत्तानुसार आतापर्यंत कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नाही. मात्र कोणतीही जोखीम घ्यायची नाही.
लंडन - जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका ब्रिटनच्या राणीलाही बसला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात ६ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. चीनपाठोपाठ इटलीमध्ये या व्हायरसने सर्वाधिक बळी घेतले आहेत.
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनाही कोरोनाच्या भीतीमुळे बर्मिंघॅम पॅलेस सोडून विंडसर कॅसलमध्ये नेण्यात आलं आहे. जर देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला तर त्यांना आणि प्रिन्स फिलिपला सैंड्रिगममध्ये वेगळं ठेवण्यात येईल अशी त्यांची योजना आहे. राजघराण्यातील एका सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, राणीला विंडसरमध्ये नेण्यात आले आहे. त्यांची तब्येत बरी आहे, पण त्यांना तेथून हलवणे चांगले आहे. राणीच्या कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची दहशत आहे.
रिपोर्टनुसार, पॅलेसमध्ये जगभरातील नेत्यांचे येणंजाणं होत असतं. नुकतीच राणीने बर्याच लोकांना भेट दिली होती. महाराणीचा 94 वा वाढदिवस काही दिवसांवर आला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांची जागा बदलण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. बर्मिंघॅम पॅलेस एक धोकादायक जागा असू शकेल' लंडनच्या मध्यभागी असलेले आणि इतर ठिकाणांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत असं सूत्रांनी सांगितले आहे.
'द सन' या दैनिकाच्या वृत्तानुसार आतापर्यंत कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नाही. मात्र कोणतीही जोखीम घ्यायची नाही. बर्मिंघम पॅलेसमध्ये सुमारे 500 लोक आहेत, विंडसरमध्ये 100 आणि सैंड्रिगममध्ये 12 जणांचा स्टाफ आहे. मे आणि जूनमध्ये आयोजित पॅलेसच्या पार्ट्या रद्द किंवा पुढे ढकलल्याच्या मार्गावर आहेत, ज्यामध्ये 30,000 अतिथी भाग घेऊ शकतील. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1 हजार 140 लोकांना कोरोना झाल्याचं आढळून आलं आहे. त्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
युरोपमध्ये कोरोना व्हायरसमुळे 2000 हून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. इटलीमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू 368 झाले. त्याचबरोबर स्पेनमध्येही हा आजार वाढत आहेत. स्पेनमधील 100 हून अधिक लोक या आजाराने बळी पडले. जगातील दीड लाखाहून अधिक लोकांना या धोकादायक विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे.