Corona Virus: संपूर्ण इटलीत दुसऱ्या दिवशीही व्यवहार बंद; अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 04:13 AM2020-03-12T04:13:07+5:302020-03-12T04:13:22+5:30
जगभर रुग्ण १,१७,३३९ : इटलीत ६३१, तर अमेरिकेत ३१ दगावले; ब्रिटनच्या मंत्र्यांनाही लागण
रोम : कोरोना व्हायरसशी (कोविड-१९) संबंधित मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे संपूर्ण इटलीत बुधवारी दुसºया दिवशीही व्यवहार बंदच होते. सगळ्या जगात या विषाणूने दहशत निर्माण केल्यानंतर न्यूयॉर्कने या रोगाला अटकाव करण्यासाठी नॅशनल गार्ड तैनात केले आहेत.
युरोप खंडात कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका बसला आहे तो इटलीला. मंगळवारपर्यंत त्याने देशात ६३१ जणांचा बळी घेतला होता. कोविड-१९ ने जगभर क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि राजकीय घटनांवर मोठाच परिणाम घडवून आणला आहे. कोविड-१९ चा उद्रेक पहिल्यांदा चीनमध्ये झाला. आता आम्ही या विषाणूवर मूलत: नियंत्रण मिळवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु जगभर याचे रुग्ण अनेक पटींनी वाढत चालले आहेत. दुकानांमध्ये याची दहशत निर्माण झाली असून, आर्थिक बाजारपेठेत अचानक काहीही घडत आहे.
मध्य अमेरिकेतील पनामात कोविड-१९ ने ६४ वर्षांच्या व्यक्तीचा पहिला बळी मंगळवारी घेतला. चीनमध्ये कोविड-१९ चे ८० हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून, तेथे आणखी २२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ३,१५८ वर गेल्याचे बुधवारी अधिकाºयांनी सांगितले. संपूर्ण जगात कोविड-१९ चे एक लाख १७ हजार ३३९ रुग्ण, तर १०७ देशांत ४,२५१ (चीनचे ३१५८ समाविष्ट) जण मरण पावले आहेत. इटली हे चीननंतर कोरोना व्हायरसचे जगातील दुसरे केंद्र बनू नये, यासाठी रोमने कॅफेंमध्ये पोलीस पहारा लावला आहे. दिवसा कॅफेंमध्ये ग्राहक एकमेकांपासून तीन फूट दूर असावेत, याची काळजी पोलीस घेत आहेत, तर सायंकाळी सहानंतर तर कॅफे बंदच ठेवावा लागतो आहे. चीनमध्ये मात्र दैनंदिन जीवन हळूहळू का असेना पूर्वपदावर येत आहे.कोविड-१९ ची बाधा झालेल्यांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. चीननंतर सगळ्यात जास्त रुग्ण आज इटलीतच आहेत. सोमवारी तेथे ४६३ रुग्ण होते ते मंगळवारी ६३१ झाले.
काही कंपन्यांचे काम सुरू होणार
बीजिंग : चीनच्या वुहान शहरातील काही कंपन्यांना कामकाज सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. कोविड-१९ चा गेल्या वर्षी हुबेई प्रांतात पहिल्यांदा उद्रेक झाल्यावर कंपन्यांना बंद करण्यात आले होते. दैनंदिन गरजांच्या उत्पादनांच्या कंपन्यांना ताबडतोब काम सुरू करण्यास सांगितले जाईल, असे हुबेई प्रांत अधिकाºयांनी सांगितले. इतर कंपन्या मात्र २० मार्चनंतर कामकाज सुरू करतील.
ज्या भागात कोविड-१९ चा धोका मध्यम किंवा खूप कमी आहे, अशा भागांत कंपन्यांना काम सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे.
अमेरिकेतील विद्यापीठांत वर्ग बंद
जगभरात कोरोना व्हायरसची बाधा एक लाखापेक्षा जास्त लोकांना झाल्यानंतर कॅलिफोर्निया ते न्यूयॉर्कपर्यंतच्या विद्यापीठांनी विद्यापीठ परिसरातील वर्ग बंद केले आहेत. कोविड-१९ चा सर्वात जास्त फटका बसलेल्या सिएटल एरिया, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क राज्यांत आणि भागांत वर्ग रद्द करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहेत. ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ईव्ही लीग इन्स्टिट्यूशनमध्ये वर्ग बंद करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला.
शाळांमधील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्यांत परतण्याच्या तयारीत आहेत किंवा परतत असल्यामुळे त्यांनी चीन, इटली आणि दक्षिण कोरियाचा प्रवास टाळावा असा सल्ला शाळांनी दिला आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांना आता १४ दिवस परत येऊ नका व १४ दिवसांनंतर तुमच्या तुमच्या राज्यांच्या नियमांनुसार निर्णय घ्या, असेही सांगितले आहे. एका विद्यापीठाने तर विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसर लगेच सोडा, असेही सांगितले आहे. या महत्त्वाच्या विद्यापीठांनी एक तर वर्ग थांबवले आहेत किंवा रद्दच केले आहेत.
इराणला दुसरे विमान पाठविले जाणार!
संपूर्ण इराणवर कोरोनाचे संकट गडद झाल्याने तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारताने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. इराणमधून ५८ भारतीयांसह पहिले विमान मंगळवारी मायदेशी दाखल झाले. अद्याप ७ कोरोनाग्रस्त भारतीय तेथे आहेत. त्यांना प्राधान्याने व त्यानंतर इतरांनाही आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढच्या आठवडाभरात विमान पाठवले जाण्याची शक्यता आहे.
इराणमध्ये कोरोनामुळे दोनशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून, लागण झालेल्यांची संख्या ७ हजारांवर पोहोचली आहे. भारतीयांना तेथून सुरक्षित मायदेशी आणण्याचे मोठे आव्हान परराष्ट्र मंत्रालयासमोर आहे. मंगळवारी आलेल्या विमानातून ‘त्या’ सात जणांनी येण्यास असमर्थतता दर्शवली होती. त्यांचे कुटुंब तेथे आहे. त्यातील कुणालाही अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही.