एकच नंबर! कोरोनावर येतेय 'सुपरव्हॅक्सीन', ना व्हेरिअंटची झंझट, ना राहणार महामारीचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 02:58 PM2021-06-23T14:58:37+5:302021-06-23T14:59:32+5:30
कोरोनावर आता जालीम इलाज करायचं वैज्ञानिकांनी ठरवलं आहे आणि एक जबरदस्त लस शोधून काढलीय.
कोरोना महामारीचा सामना करताना जगभरात आता कोरोनाच्या विविध व्हेरिअंटमुळे डोकेदुखी वाढताना दिसत आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे विविध प्रकार आता समोर येत आहेत आणि त्यामुळे चिंता वाढली आहे. पण यासर्वांवर जालीम इलाज करायचं वैज्ञानिकांनी ठरवलं आहे आणि त्यादृष्टीनं काम देखील सुरू झालं आहे.
वैज्ञानिक सध्या अशा कोरोना विरोधी सुपरव्हॅक्सीन तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत की ज्यामुळे कोरोनाचे सर्व व्हेरिअंट संपुष्टात येतील. इतकंच नव्हे, तर भविष्यात महामारीला रोखण्यासाठी देखील या लसीची मदत होईल.
पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिक सध्या अशा लसीवर काम करत आहेत की जी कोविड-१९ सोबतच कोरोनाच्या इतर सर्व प्रकारांवर प्रभावी ठरू शकेल. वैज्ञानिकांकडून या लसीची चाचणी सध्या उंदरांवर केली जात आहे. अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आता यावर संशोधन सुरू केलं आहे. भविष्यात आणखी कोणता विषाणू हाहाकार करेल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला आतापासूनच विचार करायला हवा, असं वैज्ञानिकांनी म्हटलं.
कोरोना विषाणूच्या प्रवर्गातील प्रत्येक प्रकार नष्ट करणार
कोरोना व्हायरससोबतच त्याच्या सर्व प्रकारांना नष्ट करेल अशा लसीची निर्मिती केली जात आहे. या लसीमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या सर्वच महामारीच्या संकटावर मात करता येईल. या लसीला सेकंड जनरेशन लस असं संबोधण्यात येत आहे. कोरोनाच्या मूळावर घाव करुन या विषाणूच्या सर्व व्हेरिअंटवर ही लस प्रभावी ठरते. याच प्रवर्गातील दोन व्हेरिअंटनं गेल्या दोन दशकांमध्ये जगात हाहाकार केला आहे. एक म्हणजे सार्स आणि दुसरा कोविड-१९
मानवी चाचणी केव्हा सुरू होणार?
वैज्ञानिकांनी तयार केलेल्या लसीची उंदरांवर चाचणी घेण्यात आली. यात उंदरांमध्ये अँटीबॉडीज तयार होत असल्याचं दिसून आलं आहे. यात स्पाइक प्रोटीनचा सामना करू शकेल अशा अँटीबॉडीज तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. चाचणी घेण्यात आलेले उंदीर सार्स आणि कोविड-१९ विषाणूनं पीडित उंदीर होते. यासर्वांची सविस्तर चाचणी सुरू असून सर्व योग्य राहिलं तर पुढील वर्षात याची मानवी चाचणी केली जाऊ शकते, असं सांगण्यात येत आहे.