Corona Virus : सावधान! "कोरोनाच्या आणखी एका लाटेचा सामना"; 'या' देशात दररोज 2000 लोकांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 12:01 PM2023-10-07T12:01:15+5:302023-10-07T12:10:12+5:30
Corona Virus : कोरोनाने कहर सुरू केला आहे. दररोज 2000 हून अधिक प्रकरणं समोर येत आहेत यावरून कोरोना किती भयावह आहे, याचा अंदाज येतो.
कोरोना व्हायरस या जगातून संपलेला आहे असा जर तुम्ही विचार करत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे, कारण पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. सिंगापूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर सुरू केला आहे. दररोज 2000 हून अधिक प्रकरणं समोर येत आहेत यावरून कोरोना किती भयावह आहे, याचा अंदाज येतो.
सिंगापूरचे आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी शुक्रवारी इशारा दिला आहे की, देश कोविड -19 च्या आणखी एका लाटेचा सामना करत आहे आणि येत्या आठवड्यात आणखी लोक आजारी पडण्याची आणि रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. ओंग म्हणाले की, तीन आठवड्यांपूर्वी कोविड-19 ची दररोज सुमारे एक हजार नवीन प्रकरणे नोंदवली जात होती, तर गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज 2,000 हून अधिक लोकांना संसर्ग होत आहे.
सिंगापूरमध्ये नुकत्याच नोंदवलेल्या कोरोना प्रकरणांमध्ये, बहुतेक प्रकरणांमध्ये EG.5 आणि HK.3 या व्हायरसच्या दोन उप-प्रकारांमुळे संसर्ग झाला आहे. दोन्ही सबफॉर्मेट्स XBB Omicron फॉरमॅट गटाशी संबंधित आहेत. येथे चॅनल न्यूज एशियाशी बोलताना ओंग म्हणाले, संसर्गाच्या दैनंदिन प्रकरणांमध्ये, 75 टक्के रुग्णांना या दोन प्रकारांमुळे संसर्ग होत आहे.
ते म्हणाले की, यावर्षी मार्च ते एप्रिल या काळात आलेल्या कोरोनाच्या लाटेप्रमाणे यावेळीही कोणतेही निर्बंध लादण्याची योजना नाही. एप्रिलमध्ये दैनंदिन प्रकरणांची संख्या सुमारे चार हजारांवर गेली होती. जगाने कोरोनाचे भयंकर रूप पाहिले आहे, जिथे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वत्र मृत्यूचा तांडव होता. भारतापासून अमेरिका आणि रशियापर्यंत कोरोनाने थैमान घातले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.