Corona Virus: कोरोनाच्या संकटामागे अमेरिकेचा डाव; चीनच्या अधिकाऱ्यांनी का केला ‘हा’ दावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 07:45 AM2020-03-18T07:45:08+5:302020-03-18T07:54:39+5:30
अमेरिकन पत्रकारांना हाँगकाँग आणि मकाओसह चीनच्या कोणत्याही भागात पत्रकार म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही असं चीनने एका निवेदनात म्हटलं आहे.
वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला चीनी व्हायरस असं संबोधल्यामुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. त्याचे पडसाद म्हणून चीनने अमेरिकन दैनिकाच्या पत्रकारांना देशाबाहेर काढलं आहे. न्यूज एजेन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट आणि वॉल स्ट्रीट जनरल यांच्याशी संबंधित पत्रकारांची देशातून हद्दपार केलं. चीनने गेल्या काही वर्षांत परदेशी माध्यमांवर केलेली ही सर्वात कठोर कारवाई आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला चीनी व्हायरस म्हटल्यानंतर चीन आणि अमेरिकेतला हा वाद उफाळून आला. त्यानंतर चीनमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने कोरोना संकटामागे अमेरिकेचे डाव असल्याचा दावा केला. आता चीनने म्हटलं आहे की, ट्रम्प सरकारने फक्त चीनी सरकारी माध्यमांशी संबंधित निवडक चिनी पत्रकारांनाच राहू देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आम्हाला अमेरिकन पत्रकारांना देशाबाहेर काढावं लागलं.
अमेरिकन पत्रकारांना हाँगकाँग आणि मकाओसह चीनच्या कोणत्याही भागात पत्रकार म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही असं चीनने एका निवेदनात म्हटलं आहे. बीजिंगने व्हॉईस ऑफ अमेरिका, द न्यूयॉर्क टाइम्स, द वॉल स्ट्रीट जर्नल, द वॉशिंग्टन पोस्ट आणि टाइम मासिकाला आपल्या कर्मचार्यांची, मालमत्ता, कामकाज आणि चीनमधील रिअल इस्टेटच्या मालमत्तांविषयी लेखी माहिती देण्यास सांगितले आहे. वॉशिंग्टनने अलीकडेच हे नियम चीनच्या सरकारी माध्यमांसाठी लागू केले. अमेरिकेनेच मीडिया संस्थांविरूद्ध केलेल्या कारवाईच्या बदल्यात पावले उचलण्यास भाग पाडले गेले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी चीनला या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले आहे.
पॉम्पीओ म्हणाले की, चीन आपल्या सरकारी मीडिया संस्थेचे अमेरिकेच्या स्वतंत्र मीडिया संस्थांशी तुलना करून चूक करत आहे. चीनीच्या या निर्णयाचे वाईट वाटते. यामुळे जगातील स्वतंत्र पत्रकारितेच्या उद्दीष्टाला धक्का बसेल. जागतिक संकटाच्या वेळी, चीनमधील लोकांना अधिक माहिती आणि अधिक पारदर्शकता आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे जीवन वाचू शकेल. त्यामुळे हा निर्णय दुर्दैवी आहे. चीन सरकार त्यावर पुनर्विचार करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
न्यूयॉर्क टाइम्सने केली टीका
द न्यूयॉर्क टाइम्सचे कार्यकारी संपादक डीन बकेट यांनी चीनच्या या कारवाईवर टीका केली आहे, दोन्ही देशांचे सरकार लवकरच हा वाद मिटवेल अशी अपेक्षा आहे, न्यूयॉर्क टाइम्स चीनमध्ये 1850 पासून वृत्तांकन करत आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त पत्रकार चीनमध्ये आहेत असं त्यांनी सांगितले.