corona virus : जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहानमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 05:55 AM2021-01-31T05:55:01+5:302021-01-31T05:55:47+5:30
corona virus : कोरोना व्हायरस नेमका कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने वुहानमध्ये अन्य एका रुग्णालयाला भेट दिली.
वुहान : कोरोना व्हायरस नेमका कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने वुहानमध्ये अन्य एका रुग्णालयाला भेट दिली. या रुग्णालयात कोरोना महामारीच्या फैलावाच्या प्रारंभीच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. जिनयांतन रुग्णालयात २०२०च्या प्रारंभी रुग्णांवर उपचार केले जात होते.
पथकाने चीनच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली व कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार केलेल्या रुग्णालयाला भेट दिली. हे पथक आगामी काही दिवसांत वुहानमधील अनेक ठिकाणांना भेटी देणार आहे. या पथकात पशुवैद्यक, विषाणू विज्ञान, खाद्य सुरक्षा व महामारी विशेषज्ञ सहभागी आहेत.
चीनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या पहिल्या रुग्णाचा उपचार हुबेई इंटिग्रेटेड चायनिज व वेस्टर्न मेंडिसीन हॉस्पिटलमध्ये करण्यात आला होता. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण २७ डिसेंबर, २०१९ रोजी समोर आला होता.
जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर म्हटले आहे की, हे पथक रुग्णालये, हुनान सीफूड मार्केट, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, तसेच वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या प्रयोगशाळेला आणि कोरोना व्हायरसशी संबंधित ठिकाणांना भेटी देणार आहे.
तथापि, पथकाच्या दौऱ्याने व्हायरसच्या उत्पत्तीबाबत सविस्तर माहिती मिळणे कठीण आहे, असे समजले जात आहे. चीनच्या दौऱ्यावर आलेले पथक १४ दिवस क्वारंटाइन होते. तो कालावधी संपल्यानंतर ही कारवाई सुरू झाली आहे. जिनयांतन रुग्णालयात २०२०च्या प्रारंभी रुग्णांवर उपचार केले जात होते.