जगात १ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, बळींची संख्या ३४००

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 04:37 AM2020-03-07T04:37:35+5:302020-03-07T04:37:44+5:30

चीनमध्ये कोरोनाचे नवे १४३ रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात १ लाख लोकांना संसर्ग झाला आहे, तर ३४०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

Coronary infection: 1 in 3 million people in the world | जगात १ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, बळींची संख्या ३४००

जगात १ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, बळींची संख्या ३४००

Next

बीजिंग : चीनमध्ये कोरोनामुळे आणखी ३० जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता ३०४२ वर पोहोचली आहे, तर संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ८०,५५२ वर पोहोचली आहे. चीनमध्ये कोरोनाचे नवे १४३ रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात १ लाख लोकांना संसर्ग झाला आहे, तर ३४०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, ३० पैकी २९ मृत्यू हे हुबेई प्रांतात झाले आहेत. तर, एका व्यक्तीचा मृत्यू हेनान प्रांतात झाला. १०२ संशयित रुग्ण समोर आले आहेत. यामुळे संशयित रुग्णांची संख्या वाढून ४८२ झाली आहे.
चीनमध्ये गुरुवारपर्यंत ८०,५५२ लोकांना संसर्ग झाला आहे. २३,७८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३,७२६ लोकांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. आयोगाने सांगितले की, गुरुवारी विदेशातून आलेल्या १६ लोकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले
आहे.
यातील ११ लोक गांसू प्रांतातील आहेत. ४ जण बीजिंग आणि एक व्यक्ती शांघाईमधील आहे. यामुळे विदेशातून आलेल्या पीडितांची संख्या ३६ झाली आहे.
अमेरिकेने ८.३ अब्ज डॉलरच्या
मदतीचे विधेयक केले मंजूर
अमेरिकेच्या उत्तर पश्चिम भागात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असताना आणि बळींचा आकडा १२ वर पोहोचला असताना अमेरिकी संसदेने या रोगाशी लढण्यासाठी ८.३ अब्ज डॉलरचे आपत्कालीन विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक आता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाऊ शकते.
अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीत समोर आला होता, तर २९ फेब्रुवारी रोजी देशात या रोगाने पहिला मृत्यू झाला. कोरोना देशात १५ प्रांतात पसरला आहे, तर १८० पेक्षा अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे.
काही दिवसांत देशात १२ लाख टेस्ट किट वितरित करण्यात येणार आहेत, तर पुढील आठवड्यापर्यंत देशात ४० लाख आणखी किट वितरित करण्यात येणार आहेत. (वृत्तसंस्था)
>जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
कोरोनाला अनेक देश गांंभीर्याने घेत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. युरोप आणि अमेरिकेत या रोगाचा प्रकोप वाढला आहे.
जागतिक बाजारपेठेवर परिणामांची चिंताही भेडसावत आहे. इटली, फ्रान्स, इराणमध्ये संसर्ग वाढत आहे, तर एक जहाज कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. तसेच जगातील ३० कोटी विद्यार्थ्यांना आपल्या घरी पाठविण्यात आले.
सेनेगलमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाºयास संसर्ग
सेनेगलमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाºयास कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेगलमध्ये आणखी दोन रुग्ण समोर आले आहेत.
यात ब्रिटनमधील एका ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. सेनेगलमध्ये आतापर्यंत चार रुग्ण समोर आले आहेत.
>इराणमध्ये फसलेल्यांचे नमुने विमानाने आणणार
इराणमध्ये अडकलेल्या जवळपास ३०० भारतीय नागरिकांचे नमुने तपासणीसाठी विमानाने आणण्याचा निर्णय नागरी उड्डयण मंत्रालयाने घेतला आहे. या नागरिकांना संसर्ग झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या विमानाने भारतीय नागरिकांचे नमुने आणण्यात येणार आहेत त्याच विमानात भारतात अडकलेल्या दोन हजार इराणी नागरिकातून काही परतही जाणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डयण सचिव पी.एस. खरौला यांनी सांगितले की, इराणमध्ये जवळपास २ हजार भारतीय फसले आहेत. यातील बहुतांश काश्मिरच्या कारगीलचे आहेत. तसेच, भारतातही इराणचे जवळपास २ हजार नागरिक आहेत.
यातील बहुतांश लोक कोरोना पसरण्याच्या अगोदर येथे आले होते. ३०० भारतीयांचे नमुने येथे आणण्यात येतील. येथे प्रयोगशाळेत तपासणीनंतर ते जर कोरोनामुक्त असतील तर त्यांना विमानाने परत आणण्यात येईल.
>व्हॅटिकनसिटीत कोरोनाचा पहिला रुग्ण
व्हॅटिकनसिटीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, इराणचे विदेशमंत्री मोहम्मद जावेद यांचे सल्लागार हुसैन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत १०७ जणांचा मृत्यू झाला असून ३५१५ जणांना संसर्ग झाला आहे. सॅन फ्रान्सिस्कोपासून जवळच रोखण्यात आलेल्या ग्रँड प्रिन्सेस या जहाजामधील प्रवाशांना आता तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. गत प्रवासादरम्यान या जहाजातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता, तर अन्य चार जणांना संसर्ग झाला आहे. या जहाजावर ३५०० प्रवासी अडकले आहेत.

Web Title: Coronary infection: 1 in 3 million people in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.