पुन्हा कोरोनाची भीती; शांघायमध्ये लाेकांना घराबाहेर पडण्यास मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 06:25 AM2022-04-02T06:25:02+5:302022-04-02T06:25:57+5:30
लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा; १.६ काेटी लोकांची चाचणी
बीजिंग : चीनचे महत्त्वाचे औद्याेगिक शहर शांघायमध्ये काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने दुसऱ्या टप्प्याचा लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. सुमारे १.६ काेटी जनतेची लाॅकडाऊनदरम्यान काेराेना चाचणी करण्यात येणार आहे.
शांघामध्ये काही दिवसांपासून काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ हाेत आहे. गेल्या २४ तासांत एकाच दिवसात चार हजारांहून अधिक जणांना काेराेनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे संसर्ग राेखण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांची काेराेना चाचणी करण्यासाठी शांघायमध्ये दाेन टप्प्यांमध्ये लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. दुसऱ्या टप्प्यात पश्चिमेकडील भागांचा समवेश आहे. या भागातील नागरिकांना पुढील चार दिवस घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. लाॅकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे.
चाचणीसाठी दाेन तास प्रतीक्षा
नागरिकांना चाचणीसाठी तपासणी केंद्रावर पाेहाेचण्याची सूचना करण्यात आली हाेती. या ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असून, चाचणीसाठी दाेन तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
कुंपणाला ठाेकले कुलूप :
काेणीही बाहेर पडू नये म्हणून घराबाहेरील कुंपणाला कुलूप लावण्यात आले आहे. जेवण व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा एका ठिकाणापर्यंत पाेहाेचविण्यात येत आहे.