कोरोनाचा लपंडाव? दोन पॉझिटिव्ह, दोन निगेटिव्ह; टेस्लाच्या मालकांच्या एकाच दिवशी चार टेस्ट
By हेमंत बावकर | Published: November 13, 2020 04:01 PM2020-11-13T16:01:58+5:302020-11-13T16:02:56+5:30
CoronaVirus News: मस्क यांनी गुरुवारी ट्वीट करून सांगितले की, काहीतऱी घोटाळा सुरु आहे. आज माझी चारवेळा कोरोना टेस्ट करण्यात आली.
स्पेसएक्स आणि टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी कोरोना चाचण्यांवर खळबळजनक दावा केला आहे. एकाच दिवशी त्यांनी चार कोरोना टेस्ट केल्या. यापैकी दोन पॉझिटिव्ह तर दोन निगेटिव्ह आल्या आहेत. यावर मस्क यांनी प्रश्न उपस्थित करत काहीतरी गडबड आहे असे म्हटले आहे.
एलन मस्क यांनी मार्चमध्ये म्हटले होते की, कोरोनाचा एप्रिलपर्यंत एकही पेशंट अमेरिकेत सापडणार नाही. परंतू कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झालेला पहिला देश हा अमेरिका आहे.
मस्क यांनी गुरुवारी ट्वीट करून सांगितले की, काहीतऱी घोटाळा सुरु आहे. आज माझी चारवेळा कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन टेस्ट या निगेटिव्ह आल्या, तर दोन पॉझिटिव्ह आल्या आहेत. एकच मशीन, त्याच टेस्ट आणि त्याच नर्स असेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांनी ही रॅपिड अँटीजन टेस्ट असल्याचेही म्हटले आहे. या त्यांच्या ट्विटवर एका युजरने यामुळेच अमेरिकेत कोरोना रुग्ण एवढे वाढले का असे विचारले. यावर मस्क यांनी उत्तर देत जे माझ्यासोबत झाले ते इतरांसोबतही होत आहे, असे म्हणत कोरोना चाचणीवरच शंका उपस्थित केली आहे.
Something extremely bogus is going on. Was tested for covid four times today. Two tests came back negative, two came back positive. Same machine, same test, same nurse. Rapid antigen test from BD.
— Elon Musk (@elonmusk) November 13, 2020
यानंतर मस्क यांनी सांगितले की, दुसऱ्या लॅबमधूनही पॉलिमरीज टेन रिअॅक्शन टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टचा रिझल्ट येण्यासाठी 24 तास लागणार आहेत. एका ट्विटर युजरने त्यांना कोणती लक्षणे दिसली, असे विचारले. तेव्हा त्यांनी सर्दी, ताप आला होता, मात्र काही संशयास्पद लक्षणे दिसली नाहीत, असे सांगितले.
रॉयटर्सनुसार मस्क हे Becton Dickinson and Co's च्या रॅपिड अॅक्शन टेस्टबाबत बोलत आहेत. सप्टेंबरमध्ये कंपनीने सांगितले होते की, अमेरिकेच्या नर्सिंग होममधून येत असलेल्या या उलट सुलट प्रकारांचा तपास करत आहे. त्यांचे कोरोना टेस्टिंग इक्विपमेंट चुकीचे रिझल्ट देत आहेत. जगभरात कोरोनाचे रुग्ण 5.26 कोटी झाले असून 1291920 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिकेत कोरोना व्हायरस महामारीच्या नव्या लाटेने हाहाकार घातला आहे. तेथे गेल्या 24 तासांत तब्बल दोन लाखहून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच बरोबर आता अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 10 कोटी 55 लाख 9 हजार 184वर पोहोचला आहे.