CoronaVaccine: अमेरिका करणार जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण; जो बायडेन यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 06:20 AM2021-06-23T06:20:06+5:302021-06-23T06:20:20+5:30
भारतासह आशियाई देशांना मिळणार लस
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी जागतिक स्तरावर आशियाई देशांना कोरोना विषाणूवरील ५.५ कोटी लसी देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारत आणि बांगलादेश यासारख्या आशियाई देशांना १.६ कोटी लसी देण्यात येणार आहेत.
याआधी अमेरिकेने कोरोनाच्या २.५ कोटी लसी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हे मिळून आतापर्यंत आठ कोटी लसींचे वितरण बायडेन प्रशासनाने जाहीर केले आहे. बायडेन यांनी जागतिक स्तरावर कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी या लसींचे वितरण जूनअखेरपर्यंत करण्याचे ठरविले होते.
व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, ‘अध्यक्ष बायडेन यांनी जगभरातील कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी आपला लढा सुरू ठेवला असून संपूर्ण जगाला लसी देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याअंतर्गत आम्ही आमच्या स्थानिक पुरवठ्यांमधून लसी देण्याची योजना आखली आहे. जूनअखेरपर्यंत आठ कोटी लसींचे वाटप करण्याचे म्हटले आहे. याचबरोबर, व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, आठ कोटी लसींपैकी ७५ टक्के कोव्हॅक्स मोहिमेद्वारे वितरित केल्या जातील, तर २५ टक्के लस संक्रमणाच्या मोठ्या घटनांचा सामना करणाऱ्या देशांना पुरवल्या जातील.
आतापर्यंत जगात १७.९२ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण
आता जगातील कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. रविवारी जगात २ लाख ९५ हजार २२९ लोकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यादरम्यान ३ लाख २५ हजार ४४७ लोकांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जगात १७.९२ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ३८.८२ लाख लोकांचा मृत्यू झाला, तर १६.३८ कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.