CoronaVirus News: कोरोनाचा कहर! जगातील रुग्णांचा आकडा १ कोटीच्या पुढे; ५ लाखांहून अधिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 09:25 AM2020-06-28T09:25:54+5:302020-06-28T09:29:16+5:30
जगातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ; अमेरिकेत २५ टक्के रुग्ण
मुंबई: जगातील कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली असून ५ लाखांहून अधिक जणांनी यामुळे जीव गमावला आहे.
चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोना विषाणू पसरला. सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाचे १ कोटीहून अधिक रुग्ण असल्याची आकडेवारी www.worldometers.info संकेतस्थळानं दिली आहे. सध्या जगात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८२ हजार ६१३ इतकी आहे. आतापर्यंत ५ लाख १ हजार ३०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या ५४ लाख ५८ हजार ५२३ इतकी आहे. तर ४१ लाख २२ हजार ७८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगातील कोरोना रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण एकच्या अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ लाखांच्या आसपास पोहोचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख २८ हजार १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ११ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या १४ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे १३ लाख रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये ५७ हजारांहून अधिक जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. रशियामध्ये कोरोनाचे ६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा ९ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे १६ हजारहून अधिक जणांचा बळी गेला आहे.