coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 09:27 AM2020-03-28T09:27:43+5:302020-03-28T09:29:03+5:30
24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे.
न्यूयॉर्क - संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिका हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1544 जणांचा मृत्यू झाला आहे.
जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 717 एवढा झाला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 ट्रिलियन डॉलरच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या मदत पॅकेजच्या माध्यमातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाणार आहे.
गेल्या चार दिवसात अमेरिकेत कोरोनाचे 50 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर जगात आतापर्यंत 5 लाख 91 हजार 802 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 26 हजार 995 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 29 हजार 790 जण उपचारानंतर बरे झाले आहे.
कोरोनाची लागण झालेल्याच्या यादीत इटली दुसऱ्या स्थानी आहे. इटलीत आतापर्यंत 86 हजार 498 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 9 हजार 134 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात इटलीत 919 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.