CoronaVirus: दोन विश्वयुद्ध पाहणाऱ्या १०६ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात; ठणठणीत होऊन परतल्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 11:12 AM2020-04-16T11:12:35+5:302020-04-16T11:13:15+5:30
तीन आठवडे जीवन आणि मृत्यूशी आजींनी संघर्ष केल्यानंतर अखेर त्यांचा विजय झाला आहे.
लंडनः कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. अमेरिका, ब्रिटनसह इटली, स्पेनसारखे देश या महारोगराईच्या कचाट्यात सापडले आहेत. सध्या ब्रिटनमध्ये १०६ वर्षांच्या आजीबाई चर्चेत आल्या आहेत. त्यांनी कोरोना व्हायरसवर मात केली असून, त्या ठणठणीत होऊन घरी परतल्या आहेत. टेलिग्राफ डॉट युकेच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये कोरोनाचा पराभव करणाऱ्या आजी त्या देशातील सर्वाधिक वयस्कर महिला आहेत. तीन आठवडे जीवन आणि मृत्यूशी आजींनी संघर्ष केल्यानंतर अखेर त्यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमधल्या या आजीबाईंनी दोन विश्वयुद्धसुद्धा पाहिली आहेत.
कॉनी टिचेन नावाच्या वृद्ध आजी बर्मिंगहॅमध्ये राहतात. टिचेन यांचा जन्म 1913मध्ये झाला होता. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा भयानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं. अखेर त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात राहून कोरोना विषाणूचा पराभव केला. या आठवड्यात कॉनी टिचेन यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी कॉनी टिचेन यांना टाळ्यांचा कडकडाटासही अलविदा केले.
टिचेन म्हणाल्या, की मी खूप भाग्यवान आहे, मी कोरोनासारख्या विषाणूचा पराभव केला आहे. आता मला माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे. त्यांची देखभाल करणारी नर्स स्मिथ म्हणाली, कॉनीची तब्येत बरी झाली असली तरी हे आश्चर्यचकित करणारं आहे. टिचेनच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की 100 वर्षे वयाची पार केल्यानंतरही त्या खूप सक्रिय राहतात. त्यांना नाचणे आणि गोल्फ खेळणे खूप आवडते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर 30 दिवसांतच त्या पुन्हा धावू लागल्या.