CoronaVirus News: कोरोना रुग्णांचा आकडा वाढला; चीननं लगेच मोठा निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 03:03 AM2020-06-18T03:03:46+5:302020-06-18T07:32:58+5:30
रेल्वेसेवेतील अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द; ९०,००० लोकांची सामूहिक चाचणी
बीजिंग : चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. येथील दोन विमानतळांवर देशांतर्गत सेवेतील १२५५ विमानांची उड्डाणे तसेच रेल्वेसेवेतील अनेक गाड्यांच्या फेºया बुधवारी रद्द करण्यात आल्या. तसेच ९०,००0 लोकांची सामूहिक चाचणी करण्यात आली. या शहरामध्ये २४ तासांत कोरोनाचे ३१ नवे रुग्ण आढळले आहेत.
बीजिंग विमानतळांवरील ७० टक्के विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच, तेथील आंतरराष्ट्रीय विमानसेवाही स्थगित केली आहे. बीजिंगमध्ये येण्यासाठी किंवा तेथून बाहेर जाण्यासाठी मंगळवारपर्यंत तिकिटांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तिकीट परतावा देण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठेही काही दिवसांपुरती बंद ठेवण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. येथील ग्रंथालये, संग्रहालये, उद्यानांमध्ये क्षमतेपेक्षा ३० टक्के लोकांनाच प्रवेश द्यावा, असा आदेश देण्यात आला आहे. सध्या बीजिंगला प्रवास केल्याने आरोग्याला धोका पोहोचू शकतो असा इशारा चीनमधील विविध प्रांतांनीच मंगळवारी दिल्यानंतर अधिक काळजी घेण्यात येत आहे.
चीनमध्ये मंगळवारी कोरोनाचे ५५ नवे रुग्ण आढळले. त्यातील ११ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यातील काही विदेशवारीहून आले आहेत. (वृत्तसंस्था)
चीनमध्ये ७८ हजार कोरोनामुक्त
बीजिंगमधील कोरोनाचा फैलाव पुन्हा सुरू झाला असला, तरी या शहरात त्या आजारामुळे अद्याप कोणीही बळी गेलेला नाही. चीनमधील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता ८३ हजारवर पोहोचली असून, अद्याप २५२ रुग्णावर उपचार सुरू आहेत. या देशात आजवर उपचारांनंतर ७८,३७९ लोक कोरोनातून पूर्णपणे मुक्त झाले आहेत.