Coronavirus: सेन फ्रान्सिस्कोत जहाजावर अडकले १३१ भारतीय; सुटकेसाठी आर्त साद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 10:37 PM2020-03-16T22:37:15+5:302020-03-16T22:37:33+5:30
पुढील १५ दिवस जहाज सेन फ्रान्सिस्कोत; नंतर ऑकलंडला जाणार
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका जहाजावर १३१ भारतीय कर्मचारी अडकले आहेत. आमचे प्राण वाचवून आम्हाला आपल्या देशात परत आणा. आम्हाला आमच्या कुटुंबांना भेटायचे आहे, अशी आर्त साद या कर्मचाऱ्यांनी घातली आहे. याप्रकरणी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय नौकानयन मंत्र्यांनी जातीने लक्ष घालून त्यांना लवकर भारतात आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशन या अशासकीय संस्थेचे विश्वस्त अॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केली आहे.
हॉलंड अमेरिका लाईनच्या मालकीच्या ग्रँड प्रिन्सेस क्रूझवर १३१ भारतीय खलाशी आहेत. जहाजावरील खलाशांपैकी एकाने संपूर्ण परिस्थिती वसई येथील त्याच्या कुटुंबाला सांगितली. यानंतर कुटुंबातील सदस्य एडलर रॉड्रिंक्स यांनी गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांना आज सकाळी फोन केला. जहाजावरील सर्व 131 कर्मचाऱ्यांना भारतात आणण्यासाठी लवकर हालचाली करण्याची त्यांनी विनंती केली. जहाजाच्या कॅप्टनने सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमच्या वैद्यकीय चाचणीचे पैसे भरण्यास नकार दिल्याने आपल्या देशात येणाचे स्वप्न भंगले. त्यामुळे आम्ही आमच्या जहाजावर परतलो. आता आमचे जहाज ऑकलंडला जाणार आहे. सध्या १५ दिवस तरी आम्ही सॅन फ्रान्सिस्को जवळील समुद्रात आहोत. या ठिकाणी आमचे जहाज नांगरून ठवले आहे. त्यामुळे जास्त उशीर करू नका, आमची सुटका करा अशी विनंती एडलर रॉड्रिंक्स यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रँड प्रिंसेस क्रूझ हे जहाज अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को बे येथे नांगरलेले आहे. काल (रविवारी) जहाजावरील १३१ भारतीय कर्मचाऱ्यांना चार्टर फ्लाइटद्वारे विमान प्रवासाची सर्व व्यवस्था केली होती आणि या जहाजातून सर्व १३१ भारतीय कर्मचारी उतरलेदेखील होते. यानंतर एका बसने त्यांना सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आले. मात्र तिथे सर्व कर्मचारी तासभर बसमध्येच अडकून पडले. उड्डाण करण्यापूर्वी जहाजावरील सदस्यांची वैद्यकीय चाचणी करावी लागेल, असे विमानतळावरील उड्डाण अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र जहाजाच्या कॅप्टनने सदस्यांचा वैद्यकीय खर्च देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना ग्रँड प्रिंसेस शिपकडे परत जावे लागले, अशी कैफियत एडलर रॉड्रिंक्स यांनी मांडल्याचे पिमेंटा यांनी लोकमतला सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे भारत सरकार परदेशात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील कर्मचार्यांनीही जहाजावर अडकलेल्या कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी सर्व आवश्यक मदत केली पाहिजे, अशी आग्रही मागणी अॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी केली.