coronavirus : इटली, स्पेननंतर अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप, एका दिवसात गेले इतके बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 08:32 AM2020-04-04T08:32:14+5:302020-04-04T08:34:51+5:30
जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे.
न्यूयॉर्क - चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचा फैलाव आता जवळपास जगभरातील सर्व देशांत झाला आहे. त्यातही युरोप आणि अमेरिकेत कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसात स्पेन आणि इटलीमध्ये कोरोनाने मृत्यूने थैमान घातले होते. तर आता अमेरिकेत कोरोनाची तीव्रता वाढली आहे. अमेरिकेत काल एका दिवसात 1321 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात काल एका दिवसात 5972 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव आता जगातील 200 हुन देशात झाला आहे. त्यातही आता अमेरिकेत कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 77 हजार 161च्या वर पोहोचली आहे. काल एका दिवसात अमेरिकेत कोरोनाचे 32 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. तर एका दिवसात 1321 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 7393 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
इतर देशांचा विचार केल्यास अमेरिकेपाठोपाठ काल फ्रान्समध्येही कोरोनाचा कहर दिसून आला. फ्रान्समध्ये काल एका दिवसात 1120 जणांचा मृत्यू झाला. फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 6507 जणांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे. इटलीमध्ये काल एका दिवसात 766 जणांचा मृत्यू झाला. इटलीमधील मृतांचा आकडा 14,681 वर पोहोचला आहे. तर स्पेनमध्ये काल एका दिवसात 850 जणांचा मृत्यू झाला. स्पेनमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 19 हजार 199 हजारांवर पोहोचला आहे.
इंग्लंड, जर्मनीमध्येही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढू लागला आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत 3605 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर जर्मनीत आतापर्यंत 1275 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर आशियाई देशात इराणमध्ये 3294 जणांचा मृत्यू झाला आहे.